जास्त मस्ती कराल तर घरी जाल; मुख्यमंत्री फडणवीसांनी दम दिल्याची माणिकराव कोकाटेंची कबुली

By नितीन चौधरी | Updated: February 24, 2025 17:01 IST2025-02-24T17:00:12+5:302025-02-24T17:01:27+5:30

जनतेच्या आशीर्वादाने राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झाल्याचे सांगून कोकाटेंनी शिंदे गटाचे नाव न घेता कुणाच्याही जाण्याने सरकारला धोका नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले

If you have too much fun you will go home Manikrao Kokate admits that Chief Minister devendra fadnavis has given him a boost | जास्त मस्ती कराल तर घरी जाल; मुख्यमंत्री फडणवीसांनी दम दिल्याची माणिकराव कोकाटेंची कबुली

जास्त मस्ती कराल तर घरी जाल; मुख्यमंत्री फडणवीसांनी दम दिल्याची माणिकराव कोकाटेंची कबुली

पुणे: तुमच्या जाण्याने सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, अगदी माझ्या जाण्यानेही नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल, असा दमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत दिला होता, अशी कबुली कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. आमचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारीही मुख्यमंत्रीच ठरवतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी पणनमंत्री जयकुमार रावल, आमदार दिलीप बनकर, अनुराधा चव्हाण, माजी खासदार देविदास पिंगळे, सहकार आयुक्त दीपक तावरे, पणन संचालक विकास रसाळ, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम उपस्थित होते.

जनतेच्या आशीर्वादाने राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झाल्याचे सांगून कोकाटे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे नाव न घेता कुणाच्याही जाण्याने सरकारला धोका नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले.

विभागाचे काम शिस्तीत झाले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसांचा कार्यक्रमच दिला आहे. त्यानुसार काम करायचे आहे, असे कोकाटे म्हणाले. आता आमचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारीही मुख्यमंत्रीच ठरवतात, असे स्पष्ट करून आमच्या हातात आता काहीही राहिले नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यामुळे आता आम्हाला काम करावेच लागेल. पण पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही चांगले काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्य अधिकाऱ्यांनी सरकारसोबत नीट सांगड घालून काम केल्यास राज्यात स्थैर्य व शाश्वती निर्माण होईल. त्यातून विकासाकडे जाता येईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे मी बाजार समित्यांना कमी लेखत नाही. याच समित्यांमुळे अनेकजण आमदार, खासदार झाले आहेत. राजकारणात उद्याचे भविष्य तुमच्या हातात आहे, असे बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधून सरकार निर्माण करण्याचे काम समित्या करत असल्याचे ते म्हणाले. तुमच्यात क्षमता असून, ती कामाला लावून जास्तीत जास्त लोकाभमिमुख काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

वरच्या न्यायालयात अपील

पात्रता नसताना नाशिक येथे म्हाडाचे घर घेतल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या कोकाटे यांनी आता वरच्या अर्थात जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत विचारले असता, या अपिलानंतर आमदारकीसाठी पात्र आहे किंवा नाही, याचा फैसला होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: If you have too much fun you will go home Manikrao Kokate admits that Chief Minister devendra fadnavis has given him a boost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.