एलआयसी बोनसची लिंक ओपन कराल तर खाते होईल रिकामे! फसवणुकीचा नवा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 11:56 AM2023-09-01T11:56:42+5:302023-09-01T12:00:02+5:30

तुम्ही जर त्यांच्या बोलण्याला बळी पडून लिंक ओपन केली, तर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, तेव्हा पॉलिसीधारकांनो सावधान!...

If you open the link of LIC bonus, the account will be empty! A new fund of fraud | एलआयसी बोनसची लिंक ओपन कराल तर खाते होईल रिकामे! फसवणुकीचा नवा फंडा

एलआयसी बोनसची लिंक ओपन कराल तर खाते होईल रिकामे! फसवणुकीचा नवा फंडा

googlenewsNext

- नम्रता फडणीस

पुणे : सायबर चोरट्यांनी आता फसवणुकीचा आणखी एक नवा फंडा शोधून काढला आहे. एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून एक लिंक पाठविली जाते. त्यात एलआयसी कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त बोनसचे तुम्ही लाभार्थी ठरला आहात, असा मेसेज असतो. त्यानंतर संबंधित व्यक्तीला स्थानिक भाषेत फोन केला जातो आणि लिंक ओपन करून किती पैसे मिळाले, हे चेक केले पाहिजे, असे विश्वासाने सांगितले जाते. तुम्ही जर त्यांच्या बोलण्याला बळी पडून लिंक ओपन केली, तर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, तेव्हा पॉलिसीधारकांनो सावधान!

दिवसेंदिवस सायबर फसवणुकीच्या तक्रारी आणि गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असल्याने सामान्यांना त्याचा सामना करणे अवघड होत आहे. सायबर चोरटेही फसवणुकीचे नवनवीन फंडे शोधून काढत आहेत. आता एलआयसी बोनसच्या नावाने फसवणुकीचा नवा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी एलआयसी बोनसच्या नावाने एलआयसी एजंट यांच्यासह पॉलिसी धारकांना लिंक पाठविण्यास सुरुवात केली आहे. ही लिंक त्यांनी ओपन केल्यास मोबाइलधारकाची वैयक्तिक माहिती, बँक खात्याचा क्रमांक, पासवर्ड आणि इतर संवेदनशील माहिती चोरट्यांच्या हाती लागू शकेल आणि क्षणातच बँक खाते रिकामे होईल.

पीडित व्यक्तीने जर पुन्हा त्या क्रमांकावर रिप्लाय केला, तर फोन बंद असल्याचे कळते. त्यामुळे एखाद्या अनोळखी क्रमांकावर आलेली कोणतीही लिंक ओपन करू नका आणि आपली वैयक्तिक माहिती व बँक खाते क्रमांक कुणालाही देऊ नका, असे आवाहन सायबरतज्ज्ञांनी केले आहे.

पॉलिसीधारकांनी कोणतीही लिंक ओपन करू नये. कोणालाही कुठल्याही प्रकारची माहिती देऊ नये. जो तुमचा एलआयसी एजंट आहे तो तुमची काळजी घेतो. तुमच्या पॉलिसीसंदर्भातील सर्व सेवांबाबत पॉलिसीधारकांनी फक्त एलआयसी एजंट किंवा एलआयसी ब्रँचमार्फत चौकशी करावी.

- कमलेश गांधी, एलआयसी एजंट

देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एलआयसी बोनस देण्यासंदर्भात सर्वांना सायबर चोरट्यांमार्फत लिंक पाठविल्या जात आहेत. त्या लिंकवर क्लिक केल्यास त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती, संपर्क क्रमांक, फोटो याचा ॲक्सेस सायबर चोरट्यांना मिळत आहे. तुमच्या संपर्क यादीतील लोकांना तुमच्याच नावाने मेसेज करून त्यांनी अशी पॉलिसी घेतली आणि त्यांना असा फायदा झाला असे सांगितले जाते. टेस्टीमोनिअल करून संपर्क यादीतील लोकांना मेसेज पाठविले जातात. त्यात हजारांपैकी शंभर लोकं फसतात. अशा हाईप नावाच्या काही साइट्स आहेत, जिथे व्हर्च्युअल क्रमांक मिळतात. कोणत्याही देशाचा क्रमांक एका महिन्याचे पैसे मोजले की मिळतो. तो क्रमांक सगळीकडे रूट केलेला असतो. त्यामुळे अशा अनोळखी क्रमांकावरील लिंक ओपन करू नयेत.

- रोहन न्यायाधीश, सायबरतज्ज्ञ

Web Title: If you open the link of LIC bonus, the account will be empty! A new fund of fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.