'नागपूर हायवेच्या कामाला पैसे दिल्यास आकर्षक परतावा देणार', असे सांगून १ कोटींना घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 04:38 PM2021-08-01T16:38:21+5:302021-08-01T16:38:36+5:30
हडपसरमधील घटना; तिघांवर गुन्हा दाखल
पुणे : नागपूर हायवेच्या रस्त्याचे काम मिळत असून भांडवलापोटी पैसे पुरविल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका तरुणाला १ कोटी १५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
हडपसर पोलिसांनी प्रतित अशित शहा (रा. आयव्हरी इस्टेट, बाणेर), कृतिका अशित शहा (रा. रहेजा इस्टेट, बोरीवली) आणि हितेश बदानी (रा. लुल्लानगर, कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अॅमनोरा पार्क टाऊनशिपमध्ये राहणार्या ३१ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून २०१७ ते ३१ जुलै २०२१पर्यंत घडला आहे़.
आरोपींनी तरुणाला नागपूर हायवेच्या रस्त्याचे काम मिळत आहे, असे सांगून या प्रकल्पासाठी भांडवल नाही. त्याकरीता पैशांची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगून १ कोटी रुपये दिल्यास त्या बदल्यात ३१.२ टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार तरुणाने त्यांना १ कोटी रुपये दिले. त्यानंतर साईटवर अपघात झाल्याचे सांगून आणखी १५ लाख रुपये त्यांच्याकडून घेतले.
त्यानंतर त्यांनी तरुणाचा विश्वास बसावा, म्हणून मुंबईतील कॅपिटल फर्स्ट या बँकेकडून कर्ज मंजूर झाले असून त्या मंजुरीचे बनावट पत्र तयार करुन खरे असल्याचे भासविले. त्यानंतर वेळोवेळी तरुणाने गुंतवणुक केलेली रक्कम व त्यावरील मोबदला मागितला असता त्यांनी टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शनिवारी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक अडागळे तपास करीत आहेत.