चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च केल्यास जावे लागेल थेट तुरुंगात !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 09:44 AM2022-08-09T09:44:28+5:302022-08-09T09:44:42+5:30
पुणे : मोबाईलमुळे मनोरंजनाच्या कक्षा विस्तारल्या असल्या, तरी त्याचा विकृत मानसिकता असलेल्यांकडून गैरवापर होताना दिसत आहे. इंटरनेटवर चॉईल्ड पॉर्नोग्राफी ...
पुणे : मोबाईलमुळे मनोरंजनाच्या कक्षा विस्तारल्या असल्या, तरी त्याचा विकृत मानसिकता असलेल्यांकडून गैरवापर होताना दिसत आहे. इंटरनेटवर चॉईल्ड पॉर्नोग्राफी मोठ्या प्रमाणावर सर्च केले जात असल्याचे दिसून येत आहे. बाल लैंगिक अत्याचाराचे किंवा बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल केले जातात. याला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या सायबर सेलकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यामुळे चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च केलेल्या काहीजणांना थेट तुरुंगात जावे लागले आहे.
गुन्हेगारांनी मोबाइलवर व्हिडिओ पाहून त्यानुसार कट रचून गुन्हे केल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. यात महिला व बाल अत्याचाराच्या घटनांचाही समावेश आहे. त्यामुळे सोशल मीडियात असे व्हिडिओ व्हायरल करण्यावर बंदी आणण्यात आली. माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यान्वये त्यावर कारवाईची तरतूद आहे. तरीही अनेकजणांकडून असे कृत्य केले जाते. परिणामी, अजाणत्या वयातच पीडित बालकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यांचे लैंगिक शोषण होऊन त्यांच्या मनावर आघात केला जातो. त्यामुळे चाईल्ड पॉर्नोग्राफी रोखण्यासाठी सरकारने कडक कायदे केले आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरूनदेखील प्रयत्न सुरू आहेत.
चाईल्ड पॉर्नोग्राफी रोखण्यासाठी विशेष मोहीम
अमेरिकेच्या 'नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग ॲण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन'(एनमॅक) ही संस्था चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात कार्यरत आहे. समाजमाध्यमे, संकेतस्थळांवरील चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत ही संस्था अमेरिकेच्या 'फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' (एफबीआय) या सर्वोच्च तपास यंत्रणेला माहिती पुरवते. भारतातून अशा ध्वनिचित्रफिती किंवा मजकूर जाहीर करणाऱ्या व्यक्तींची तांत्रिक माहिती पुरवण्याबाबत या संस्थेशी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) करार केला आहे. त्यानुसार या संस्थेने चाइल्ड पोर्नोग्राफी पसरविणारे आयपी ॲड्रेस आणि अन्य तांत्रिक माहिती पुरवली. त्याचबरोबर अनेक प्रकरणांमध्ये फेसबुकतर्फेही तांत्रिक माहिती पुरविण्यात येत आहे.
राज्यभरात चाइल्ड पोर्नोग्राफीच्या १,६८० चित्रफिती आढळल्या असून पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ९६ गुन्हे दाखल केले आहेत. पुण्यात ५४२ चित्रफिती आढळल्या होत्या. त्यात आतापर्यंत ५ गुन्हे दाखल आहेत.
माेबाईल तुमचा, लक्ष सायबरचे
बालकांचे लैगिक शोषण ही फार गंभीर बाब असून, लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती तयार करणे, इंटरनेटवर अपलोड करणे किंवा सोशल मीडियावर व्हायरल करणे हा गुन्हा आहे. अशा कारवायांवर पोलिसांची बारीक नजर आहे, असे सायबर पोलिसांनी सांगितले.