फायबर उचकटलेले अथवा चावीशिवाय गाडी चालू दिसली तर समजा चोरीची गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 09:16 PM2021-11-17T21:16:56+5:302021-11-17T21:17:08+5:30
पुणे पोलिसांकडून औरंगाबाद पोलिसांना तपासाचे धडे
पुणे : रस्त्यावर तुम्ही गस्त घालत असताना एखादी गाडी चावीशिवाय सुरु आहे. गाडीचे फायबर उचकटलेले दिसत आहे अथवा उजव्या बाजूच्या वायरी बाहेर डोकावत असल्याचे दिसल्यास संबंधित गाडी ही चोरीची असू शकते, पुणे पोलीस दलातील पोलीस नाईक नितीन मुंढे हे सांगत होते. आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील अडीशे हून अधिक पोलीस कर्मचारी वाहनचोरी रोखण्याचा हा अनुभव अगदी तन्मयतेने ऐकत होते.
सध्या सर्व शहरांमध्ये वाहन चोरीचे गुन्हे वाढीस लागले आहेत. चोरी गेलेल्या वाहनांचा शोध कसा घ्यावा, प्रलंबीत वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल कशा पद्धतीने करावी इत्यादी बाबींबाबत औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाने प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यात गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाचे पोलिस नाईक नितीन मुंढे यांनी या दोन दिवशीय कार्यशाळेला संबोधीत केले. शहरातून चोरी गेलेल्या वाहनांचा शोध लावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात मुंडे नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. वाहनचोरी विरोधी पथकात असताना मुंढे व त्यांच्या सहकार्यांनी ५००च्या वर चोरीची वाहने हस्तगत केली होती.
मागील काही दिवसापासून औरंगाबाद ग्रामीण परिक्षेत्रात वाहन चोरीचे प्रमाण वाढते आहे. चोरी जाणार्या वाहनांच्या तुलनेत गुन्ह्यांचा छडा लागण्याचे प्रमाण अल्प आहे. त्यापार्श्वभूमीवर औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक निमित गोयल यांनी पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलातील कर्मचार्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्याची पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेत मुंढे यांनी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेले प्रयत्न, वाहनचोरी रोखण्यासाठी घ्यावयाची दक्षता याची माहिती पीपीटीद्वारे दिली. पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी मुंढे यांना प्रशिस्तीपत्र देऊन सन्मानित केले.