Pune: कार्यकर्त्याला हात लागला तर तुम्हाला सुरक्षितपणे फिरता येणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 07:22 PM2023-10-04T19:22:39+5:302023-10-04T19:25:01+5:30
मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्रभाकर बांगर यांची घेतली भेट...
मंचर (पुणे) : स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांना मारहाण झाल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. येथून पुढे स्वाभिमानीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला धक्का लागला तर याद राखा, तुम्हाला सुरक्षितपणे फिरता येणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांना एकलहरे येथे मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून राजू शेट्टी यांनी सकाळी येथे येऊन बांगर यांची भेट घेत विचारपूस केली. बांगर यांनी मारहाणीचा सर्व प्रकार कथन केला. त्यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघटनेचे कार्यकर्ते नेहमीच आंदोलन करतात. त्यांच्यावर हल्ला अथवा मारहाण होणे हा प्रकार आम्हाला नवीन नाही. मात्र बांगर यांच्या मारहाण प्रकरणातील आरोपीवर कसाबसा गुन्हा दाखल झाला आहे. हे आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. पोलिस ठाण्यात महात्मा गांधी जयंतीला आरोपी हजर होते. मात्र तरीही पोलिसांच्या हाती ते लागत नाही. काही आरोपी हॉस्पिटल परिसरात फिरून दहशत निर्माण करू पाहत होते. आमच्या विरुद्ध आंदोलन कराल तर याद राखा, असा संदेश ते देऊ पाहत होते. याद्वारे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. प्रभाकर बांगर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन बाहेर आणतो. दम असेल तर पुन्हा हल्ला करा, जशास तसे उत्तर देऊ, असे ठणकावले. यावेळी प्रकाश बालवडकर, बापूसाहेब करंडे, अमरसिंह कदम, मारुती गोरडे, काशिनाथ दौंडकर तसेच उदय पाटील, सचिन बांगर, राजू बेंडे-पाटील, गणेश खानदेशे, वनाजी बांगर आदीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्रधारावर गुन्हा दाखल करावा
इथून पुढे स्वाभिमानीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला धक्का लागला तर याद राखा तुम्हाला सुरक्षितपणे फिरता येणार नाही. बांगर यांच्या वडिलांना धक्का बसल्याने त्यांनी विष प्राशन केले आहे. त्यांचे काही बरे वाईट झाले तर वेगळा गुन्हा दाखल होईल. यातील आरोपींबरोबरच सूत्रधारांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ही राजू शेट्टी यांनी केली. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटणार असल्याचे सांगून सत्तेचा माज मस्ती आल्याने तसेच वर्षानुवर्ष तीच लोक पुन्हा पुन्हा निवडून दिल्याने हा माज आला आहे. सर्वसामान्य लोक याचा विचार करतील, असे राजू शेट्टी म्हणाले.
एफआरपी अधिक चारशे रुपये सोडणार नाही. मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी दहशत माजवण्याचा उद्योग कोणी करत असेल तर रक्त सांडू, डोके फोडून घेऊ पण तुमच्या घशातून चारशे रुपये काढूच, हा कारखानदारांना इशारा आहे. या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने सुरू असून मागणी मान्य न झाल्यास साखर कोंडी करून यावर्षीचा सिझन सुरू होऊ देणार नाही.
- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना