व्यवस्था बदलायची असेल तर राजकारणात यावेच लागेल : शाह फैजल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 03:04 PM2019-01-31T15:04:20+5:302019-01-31T15:05:47+5:30
आजवर राजकीय क्षेत्राबाबत मी काहीच विचार केला नव्हता. मात्र, व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेचा भाग होऊन काम करावे लागेल. गरज पडल्यास नवा राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल असे मत माजी आय.ए.एस.अधिकारी शाह फैजल यांनी व्यक्त केले
पुणे : शाह फैजल तरुणांना चुकीच्या दिशेने घेऊन जात आहे, असे तेथील स्टेक होल्डर्सना वाटत आहे. कारण, लोकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच तेथे अनेक गैरसमज आहेत. आजवर राजकीय क्षेत्राबाबत मी काहीच विचार केला नव्हता. मात्र, व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेचा भाग होऊन काम करावे लागेल. गरज पडल्यास नवा राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल असे मत माजी आय.ए.एस.अधिकारी शाह फैजल यांनी व्यक्त केले
सरहद आणि अर्हम फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये काश्मीरमधील परिस्थिती खूप बिघडली आहे. तरुण द्वेषापोटी हातात बंदूक घेत आहेत. १०० हल्लेखोर मारले गेले, तर २०० नव्याने तयार होतात. गोळीचे उत्तर गोळीने देऊन चालणार नाही. अजून किती सैनिक आणि तरुण मारले जाणार आहेत? आपले वैधानिक अधिकार हिसकावून घेतले जात आहेत, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. तरुणांचा राजकारण्यांवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. वैधानिक अधिकारच नाहीत, तर मतदान का करावे, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जातो. तरुणांना त्यांना अधिकार मिळायला हवेत. शासन, प्रशासन आणि सामान्यांमध्ये संवादाचे पूल बांधले जावेत
याशिवाय ते म्हणाले की, काश्मिरी पंडितांशिवाय जम्मू-काश्मीरची संस्कृती अपूर्ण आहे. तेथील मुलांना मूळ संस्कृतीबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळेच काश्मीरची मूळ ओळख कायम ठेवायची असेल तर शांतता प्रस्थापित करुन काश्मीरी पंडितांनापरत बोलावले पाहिजे. तसे वातावरण निर्माण करण्याची जबाबादारी सरकारची आहे. त्यातूनच भावी पिढी विविधतेतून एकता शिकू शकेल.देश, सरकार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सरकार बरोबर किंवा चूक असू शकते. त्यावर टीका होऊ शकते. मात्र, सरकार आणि देश एकच असे गेल्या काही वर्षांपासून बिंबवले जात आहे. सरकारच्या विरोधात बोलले की देशद्रोही ठरवले जाते.
महात्मा गांधी सर्वमान्य
महात्मा गांधींना केवळ भारतातच नाही, जगात मानले जाते. अनेक ठिकाणी त्यांच्यावर संशोधन सुरु आहे. अनेक परदेशी तरुण त्यांची तत्वे अंगिकारण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मीर सध्या जळत आहे. काश्मीरमधील अशांततेतून शांततेकडे घेऊन जाणारा मार्ग गांधींच्या अहिंसक विचारांमध्येच मिळू शकतो.