काम हवंय, तर पाचशे रुपये मोजा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2015 01:14 AM2015-10-17T01:14:36+5:302015-10-17T01:14:36+5:30
पीएमपीमध्ये दररोज भ्रष्टाचाराची नवीन प्रकरणे समोर येत असतानाच; पीएमपीमध्ये कायमस्वरूपी असलेल्या वाहक तसेच चालकांना रोज काम मिळविण्यासाठी
पुणे : पीएमपीमध्ये दररोज भ्रष्टाचाराची नवीन प्रकरणे समोर येत असतानाच; पीएमपीमध्ये कायमस्वरूपी असलेल्या वाहक तसेच चालकांना रोज काम मिळविण्यासाठी पाचशे रुपयांच्या लाचेचा हप्ता द्यावा लागत आहे. विशेष म्हणजे ही रक्कम न दिल्यास संबंधित कर्मचाऱ्यास रजा टाकावी लागत असून, त्यासाठीही पुन्हा २०० रुपये मोजावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्यास नोकरी जाण्याची भीती असल्याने कर्मचारी घरीच बसणे पसंत करतात.
पीएमपीकडून टाईम कीपरची नेमणूक केली जाते. शिफ्टमध्ये सोडण्यात येणाऱ्या चालक आणि वाहकांना काम देण्याची जबाबदारी या टाईम कीपरवर असते. मात्र, हे टाईम कीपर कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांना ड्युटी लावण्यासाठी महिन्यातून दोन ते तीन वेळा चक्क ५०० रुपयांची मागणी करतात. तर हीच स्थिती डेपोमध्ये असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची आहे. जे ही रक्कम देतात त्यांना काम दिले जाते, तर इतरांना घरी पाठविले जाते. त्या पेक्षाही धक्कादाक बाब म्हणजे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना महिन्यात चार पगारी रजा मिळतात. या रजा लावून घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांना पुन्हा पैसे मोजावे लागतात. विशेष म्हणजे ही रक्कम टाईम कीपर स्वत: मागत नाहीत. त्यासाठी ते आपल्या हाताखालील क्लार्कचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.