विकास कामे करायची असेल तर मला १ लाखांची खंडणी दे; नगरसेविकेच्या पतीला धमकीचा फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 12:24 PM2020-08-14T12:24:21+5:302020-08-14T12:24:48+5:30
खंडणी दिली नाहीतर अॅट्रॉसिटीचे खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी
पुणे : वॉर्डात विकास कामे करायची असेल तर मला १ लाख रुपये दे, नाही तर तुला कामे करुन देणार नाही, अशी नगरसेविकेच्या पतीला धमकी देण्याचा प्रकार भवानी पेठेत समोर आला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी अतुल प्रभाकर नाडे (रा. लोहियानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी तुषार तानाजीराव पाटील (वय ४२, रा़ अनंत निवास, भवानी पेठ) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार पाटील हे नगरसेविका अर्चना पाटील याचे पती आहेत. अतुल नाडे हे महापालिकेत माहिती अधिकारात माहिती मागवितात. त्या माहितीच्या आधारे आपण भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत असल्याचा त्यांचा दावा आहे.
याबाबत तुषार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लोहियानगर येथील म्हसोबा मंदिरजवळ अतुल नाडे यांनी पाटील व त्यांच्या मित्रांना बोलावून घेतले होते. त्यावेळी त्यांनी येथे विकासकामे करायची असेल तर मला १ लाख रुपये दे़ नाही तर तुला कामे करुन देणार नाही. अॅट्रॉसिटीचे खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली आहे. तुषार पाटील यांनी तातडीने खंंडणी विरोधी पथकाची संपर्क साधला. त्यानंतर खडक पोलिसांनी अतुल नाडे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक बोबडे अधिक तपास करीत आहेत.