पुणे : ऑडिट करायचे तर मुंबईबरोबर पुणे महापालिकेचेही करा, आदित्य ठाकरेंचे सरकारला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 10:09 PM2023-02-23T22:09:05+5:302023-02-23T22:13:41+5:30
कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची रॅली व सभा आयोजित करण्यात आली होती.
पुणे : मुंबई महापालिकेत आम्ही ऑडिट लावू, चौकशी करू असे मध्यंतरी चालले होते. तेव्हा मीच मागणी केली प्रत्येक पैशाचे ऑडिट करा आम्ही तयार आहोत. पण तसेच ऑडिट आता नागपूर, ठाण्यात, कल्याण-डोंबिवलीसह पुणे महापालिकेतही केले पाहिजे. प्रत्येक रूपयाचा खर्च लोकांना दिसलाच पाहिजे असे आव्हान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले.
कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ, गुरुवारी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची रॅली व सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ठाकरे बोलत होते. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार श्रीनिवास पाटील, आदित्य शिरोडकर, काँग्रेसचे सुनील केदार यांच्यासह तीनही पक्षाचे शहर पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे शहरात भाजपची महापालिकेत सत्ता असताना नागरिकांना मिळकतकरात देण्यात येणारी ४० टक्के सवलत रद्द करून कर लावण्यास सांगितला. तर दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यात मुंबईत ५०० स्वे. फूटापर्यंतच्या घरांना कर रद्द केला. एकदेखील नवीन कर न लावता ९० हजार कोटी रूपये मुंबई महापालिकेकडे सरप्लस आहेत. महापालिका ही शहरवासीयांच्या हितासाठी असते हेच हे भाजप सरकार विसरले असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
आता एका पाठोपाठ एक भ्रष्ट्राचार चालू आहेत. हे गद्दार व भाजप सरकार निवडणुका लावायला तयार नाही, त्यांच्यात ही हिम्मतच राहिलेली नाही. कारण महाविकास आघाडीचे जे वातावरण राज्यात तयार झाले आहे ते पाहता ज्या दिवशी निवडणुका होतील तेव्हा हे गद्दार व भाजप सरकार साफ झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान सध्याचे मुख्यमंत्री भित्रे असून, केवळ खोक्याचे राजकारण करून राज्याचे वातावरण गढूळ करण्याचे राजकारण त्यांच्याकडून सुरू असल्याचेही ते म्हणाले. निवडणूक ही केवळ औपचारिकता आहे, विजय हा आपलाच आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बापट यांना प्रचारात आणून क्रुरतेचा कळस
चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमदेवारी देऊन सहानभुती दाखवता. मग कसब्यात लोकमान्यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी देताना ही सहानभुती कुठे गेली. गंभीर आजारी असलेल्या खासदार गिरिष बापट यांना ऑक्सिजन सिलेंडर लावून प्रचारात आणले जाते, हा क्रुरतेचा कळस असल्याचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात सांगितले.