कसबा पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती टाळायची असेल तर ब्राह्मण उमेदवारालाच संधी द्या - भगरे गुरुजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:31 PM2024-10-17T12:31:01+5:302024-10-17T12:31:38+5:30
कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी हेमंत रासनेंचा पराभव करत भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसकडे आणला
पुणे : राज्यात विधानसभेच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. मागील पोटनिवडणुकीत पुण्यातील बहुचर्चित कसबा विधानसभेने सर्वांचे लक्ष वेधले होते. आताही कसब्याबाबत केलेल्या अतुल भगरे गुरुजींच्या वक्तव्याने या मतदारसंघात खळबळ उडाली आहे. कसबा पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती टाळायची असेल तर ब्राह्मण उमेदवारालाच संधी द्या असं भगरे गुरुजी म्हणाले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पुण्यातील कसबा मतदारसंघात ब्राह्मण समाजाचे मोठे प्राबल्य असल्याची चर्चा आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनाने गेल्या वर्षी कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली होती. त्यावेळी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासनेंचा पराभव केला होता. हेमंत रासनेंना उमेदवारी दिल्याने सकल ब्राह्मण समाज नाराज झाल्याची प्रतिक्रिया पेठांमधून येत होती. पेठेतील अनेकांनी माध्यमांशी बोलताना थेट वक्तव्य केलं होत. त्यानंतर धंगेकर कसब्यातून निवडून आले. तब्बल २५ वर्षांहूनही अधिक काळ भाजपचा बालेकिल्ल असणारा कसबा मतदारसंघ काँग्रेसकडे आला.
आता मात्र उमेदवार ब्राह्मण समाजाचा असावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांनीसुद्धा उमेदवारीबाबत ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराची मागणी केली आहे. कसबा पाठोपाठ राज्यातील ब्राह्मण बहुल असलेल्या किमान ३० मतदारसंघात असे उमेदवार देण्यात यावे अशी सुद्धा मागणी समाजाकडून करण्यात आली आहे. कसब्यातून धीरज घाटे, हेमंत रासने, कुणाल टिळक हे उमेदवार इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु पक्ष कोणाला उमेदवारी देणार याबाबत अजूनही काहीच निर्णय झाला नाहीये. मागील पोटनिवडणुकीत कसब्यातून धंगेकर यांना साथ मिळाली होती. मात्र लोकसभेला सगळ्यात कमी मतदान याच विधानसभेतून धंगेकरांना झाले होते. त्यामुळे त्यांच्यासमोरही हा बालेकिल्ला काँग्रेसकडे राखून ठेवणं हे आव्हानात्मक असणार आहे.