आता बास! तुम्ही कामे करता तर आम्ही काय झोपा काढत नाही; पुण्यात अधिकारी अन् भाजप नगरसेवकात खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 19:20 IST2021-04-28T17:56:29+5:302021-04-28T19:20:53+5:30
भाजप नगरसेवकाच्या अरेवारी अन् अंगावर धावून येण्याच्या कृत्याने आरोग्य अधिकारी संतापले.

आता बास! तुम्ही कामे करता तर आम्ही काय झोपा काढत नाही; पुण्यात अधिकारी अन् भाजप नगरसेवकात खडाजंगी
पुणे : लसीकरण केंद्र सुरू करा, आमचा फोन का उचलला नाही, सीसीसीमध्ये इंजेक्शन द्या, बेड लगेच मिळाला पाहिले. अशा एक ना विविध रात्री अपरात्री येणाऱ्या आदेशामुळे आधीच त्रस्त झालेल्या महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांचा बुधवारी उद्रेक बाहेर पडला. आता बास तुम्ही कामे करता तर आम्ही काय झोपा काढत नाही. आम्ही ही डॉक्टर आहोत, आम्हाला ही लोकांच्या जीवाची काळजी आहे. तुमची अरेरावी एकूण घेण्यासाठी आम्ही तुमचे नोकर नाही. आशा संतप्त भावना व्यक्त करीत या आरोग्य अधिकाऱ्यांनी आम्ही काम सोडून जातो, तुम्हीच कामे करा असा पवित्रा घेत काम बंद करण्याचा पवित्रा काही काळ घेतला.
नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्या दालनात मागणी लावून धरली. यावेळी डॉ. भारती यांनी लसीकरण अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांना बोलाविले. त्यावेळी तुम्ही काय काम करता, रात्री फोन केला तर उचलला नाही, दोन दिवस फाईल पाठवून झाले, तुम्ही झोपा काढता का? अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. यामध्य संबंधित माननीय डॉ. जाधव यांच्या अंगावर धावून गेले. हा वाद एवढ्या विकोपाला गेला की, यामध्ये तुतु मै मै सुरू झाली. अखेर डॉ. जाधव यांना अन्य सहकारी डॉक्टरांनी व घोगरे यांना इतर सदस्यांनी मध्यस्थी करून अडविले.
दरम्यान, या घटनेमुळे सर्वच सहाय्यक आरोग्य अधिकारी संतप्त झाले. आता किती वेळा नगरसेवकांच्या अरेरावी, धमकी एकूण घ्यायची. म्हणून अखेर काम बंद करण्याचा निर्णय घेत महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे धाव घेतली आहे.