तुम्ही रस्त्यावर कुत्र्याला घाण करायला घेऊन जात असाल, तर हे वाचाच !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 02:28 PM2019-08-26T14:28:48+5:302019-08-26T14:30:55+5:30
अनेक नागरिक आपल्या पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर फिरवण्यासाठी घेऊन येत असतात. ही कुत्री रस्त्यावर तसेच फुटपाथवर घाण करत असतात. अशा नागरिकांना आता दंड ठाेठावण्यात येत आहे.
पुणे : सकाळी तुम्ही तुमच्या कुत्र्याला रस्त्यावर घाण करायला घेऊन जात असाल तर आता तुम्हाला रस्ता धुवावा लागेल. पुण्यातील काेथरुड भागात रस्त्यावर घाण करणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांना पालिकेच्या घन कचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. ज्यांची कुत्री रस्त्यावर घाण करतात त्यांना ती घाण उचलून रस्ता धुण्यास भाग पाडले आहे. तसेच अनेकांकडून दंड देखील वसूल करण्यात आला आहे.
सकाळी अनेकजण आपल्या पाळीव कुत्र्यांना घेऊन रस्त्यावर फिरण्यास येत असतात. ही कुत्री रस्त्यावर, फुटपाथवर घाण करत असतात. त्यामुळे सकाळी फिरण्यासाठी तसेच जाॅगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास हाेत असताे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना चालताना अनेक अडचणींचा सामाना करावा लागताे. याबाबतच्या अनेक तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे पालिकेच्या काेथरुड क्षेत्रिय कार्यलयाच्या घन कचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष माेहिम हाती घेतली. या माेहिमेंतर्गत त्यांनी रस्त्यावर घाण करणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांना चांगलाच दंड केला तसेच अनेकांना रस्ता साफ करण्यास सांगून धुण्यासही सांगितला. त्यामुळे येथील रस्ते, तसेच फुटपाथ स्वच्छ हाेण्यास मदत झाली आहे. या प्रभागातील मुकादम वैजनाथ गायकवाड यांनी गेल्या पंधरा दिवसात 8 ते 10 नागरिकांना रस्ता धुवून साफ करण्यास भाग पाडले आहे. तसेच गेल्या आठ दिवसात येथील नागरिकांकडून 5 हजार 300 रुपयांचा दंड देखील ठाेठावण्यात आला आहे.
गायकवाड म्हणाले, सकाळी जाॅगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना फुटपाथवरुन चालताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. अनेक नागरिकांची पाळीव कुत्री रस्त्यावरच घाण करत असल्याने परिसर अस्वच्छ झाला हाेता. त्यामुळे विशेष माेहिम हाती घेत पाळीव कुत्र्यांच्या मालकांना दंड करण्यात आला. तसेच अनेकांकडून रस्ते साफ करुन धुवून देखील घेण्यात आले. ही माेहिम पुढेही अशीच चालू ठेवण्यात येणार आहे.