गॅजेट बिघडले की, ते टाकून देऊ नका! रविवारी होणार 'ई-वेस्ट' संकलन, गरजूंना होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 11:10 IST2025-02-22T11:10:38+5:302025-02-22T11:10:50+5:30
फ्रिज, रेडिओ कॅसेट, टेप रेकॉर्डर, हेडफोन्स, डीव्हीडी, म्युझिक सिस्टिम, चार्जर, वायर्स, मोबाइल, टॅबलेट, टेबल्स, बॅटरी, प्रिंटर, लॅम्प, टीव्ही, संगणक, लॅपटॉप, मिक्सर ग्राइंडर, ओव्हन, हीटर हे स्वीकारले जाणार

गॅजेट बिघडले की, ते टाकून देऊ नका! रविवारी होणार 'ई-वेस्ट' संकलन, गरजूंना होणार फायदा
पुणे : सध्या शहरामध्ये ई-वेस्ट मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे, कारण प्रत्येकाच्या घरात विविध प्रकारचे गॅजेट वापरले जात आहेत. मोबाइल, लॅपटॉप, स्मार्ट वॉच अशा प्रकारच्या वस्तू अधिक आहेत. एखादे गॅजेट बिघडले की, ते टाकून दिले जाते. पण, त्याचे करायचे काय? हा प्रश्न असतो. त्यामुळे ‘पहल’ हा ई-कचरा व प्लास्टिक कचरा संकलन अभियान येत्या रविवारी (दि. २३) शहरात होत आहे.
संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त पुणे महापालिका, कमिन्स इंडिया फांउडेशन, पर्यावरण संरक्षण गतविधी, पूर्णम इकोव्हिजन फांउडेशन, अदर पूनावाला, केपीआयटी आदी संस्थांच्या वतीने ‘ई-वेस्ट’ संकलनाचे अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी शहरात क्षेत्रीय कार्यालय, वॉर्ड ऑफिस, मोठ-मोठ्या सोसायट्या आदी ठिकाणी संकलन केंद्र ठेवले आहेत, अशी माहिती समन्वयक भारत दामले यांनी दिली. शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक ठिकाणी २२ फेब्रुवारी रोजी, तर दुकाने, कार्यालये, रहिवासी संस्था आणि इतर केंद्रांवर २३ फेब्रुवारी रोजी संकलन करण्यात येईल.
कोणता कचरा स्वीकारला जाईल !
फ्रिज, रेडिओ कॅसेट, टेप रेकॉर्डर, हेडफोन्स, डीव्हीडी, म्युझिक सिस्टिम, चार्जर, वायर्स, मोबाइल, टॅबलेट, टेबल्स, बॅटरी, प्रिंटर, लॅम्प, टीव्ही, संगणक, लॅपटॉप, मिक्सर ग्राइंडर, ओव्हन, हीटर.
हा कचरा स्वीकारला जाणार नाही
प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे रॅपर्स, प्लास्टिकचे डबे, प्लास्टिकच्या बाटल्या, खेळणी.
येथे मिळेल केंद्रांची माहिती
शहरातील केंद्रांची माहिती www.poornamecovision.org या संकेतस्थळावर पाहता येईल. स्वयंसेवक म्हणून देखील काम करण्यासाठी येथे संपर्क करता येईल.
संकलित ई-कचऱ्यातून पुनर्वापर होऊ शकणारे लॅपटॉप आणि संगणक दुरुस्त करून वापरण्यायोग्य बनवले जातात. ते साहित्य ग्रामीण भागातील गरजू शाळा अथवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जातात. उर्वरित ई-कचरा शासनमान्य अधिकृत संस्थांना रिसायकलिंग करण्यासाठी सुपूर्त केला जातो. यंदा ६० टन ई-वेस्ट जमा होण्याची शक्यता आहे. - भारत दामले, पूर्णम इकोव्हिजन फांउडेशन
या अभियानांतर्गत सर्वांच्या प्रयत्नांमुळे ई-कचऱ्याच्या सुयोग्य व्यवस्थापनातून पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे एकत्रितपणे वाटचाल सुरू आहे. ई-वेस्टचे करायचे काय?, असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्यावर हे अभियान एक उपाय आहे. - अनुष्का कजबजे, सल्लागार समिती सदस्य, पहल अभियान
गतवर्षीचे काम
संकलन केंद्रे : ४४४
ई-कचरा संकलन : ४० टन
प्लास्टिक संकलन : १३ टन
सहभागी दाते : ७५००
स्वयंसेवक : १२००
संगणक दान : ३०