इफ्काे टाेकिओ कंपनी ताेडफाेड प्रकरण ; शिवसैनिकांना पाेलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 07:13 PM2019-11-07T19:13:52+5:302019-11-07T19:16:27+5:30
इफ्काे टाेकिओ कंपनीची शिवसैनिकांकडून बुधवारी ताेडफाेड करण्यात आली हाेती. त्याप्रकरणी पाेलिसांनी दहा शिवसैनिकांना अटक केली आहे.
पुणे : पीकविम्याचे पैसे देत नसल्याचा आराेप करत पुण्यातील इफ्काे टाेकिओ कंपनीची ताेडफाेड करणाऱ्या शिवसैनिकांना पाेलिसांनी अटक केली आहे. शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय माेरे, नगरसेवक विशाल धनवडे यांच्यासह दहा शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.
बुधवारी शिवसैनिकांनी सकाळी काेरेगाव पार्क येथील इफ्काे टाेकिओ या विमा कंपनीच्या कार्यालयाची ताेडफाेड केली. कंपनीचे कामगाज सुरु असताना 30 ते 40 शिवसैनिक कंपनीमध्ये आले आणि त्यांनी माेठ्याप्रमाणावर ताेडफाेड केली. यात कार्यलयाचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पोलिसांनी कारवाई करीत नऊ शिवसैनिकांना अटक केली.
राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडून ज्या विमा कंपनीकडे पीकविमा उतरविण्यात आला आहे, किंबहुना ज्या कंपन्या पीकविमा अदा करणार आहेत, त्यात इफ्काे टाेकिओ कंपनी नाही. असे असतानाही या कंपनीचे कार्यालय फाेडण्यात आल्याने शिवसैनिकांच्या आंदाेलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला हाेता.
राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तातडीने मिळावेत, या मागणीसाठी शिवसैनिकांकडून असे हिंसक आंदोलन करण्यात आले. यापूर्वी वेळोवेळी निवेदने देऊनही कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे, अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेनेने म्हटल आहे.