गणपती अन् देवीच्या आरतीने इफ्तार पार्टीची सुरुवात, सरोदेंनी शेअर केला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 10:43 AM2022-04-26T10:43:33+5:302022-04-26T10:47:32+5:30
सध्या रमजानचा महिना असल्याने इफ्तार पार्ट्या होत आहेत
मुंबई - राज्यातील घडामोडींवर नेहमीच कायदेशीर बाजू मांडणारे नामवंत विधिज्ञ असीम सरोदे यांनी भोंग्याच्या वादावर मत मांडलं होतं. त्यानंतर, नास्तिक मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र, 24 एप्रिल रोजी तोच मेळावा शांततेत पार पडल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या सोशल मीडियावरुन नेहमीच एक्टीव्ह असणाऱ्या अॅड. सरोदे यांनी एका आगळ्या-वेगळ्या इफ्तार पार्टीचा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या वातावरणात हा व्हिडिओ दोन्ही धर्मांबद्दल एकमेकांचा सन्मान वाढवणारा आहे.
सध्या रमजानचा महिना असल्याने इफ्तार पार्ट्या होत आहेत. हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र येत इफ्तार पार्ट्यांना हजेरी लावत एकतेचा संदेश देतात. काही दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीला सेलिब्रिटी आणि मंत्रीही हजर होते. आता, पुण्यातील नामवंत वकिल असीम सरोदे यांनी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, आपण आयुष्यात पहिल्यांदाच इफ्तार पार्टीला हजेरी लावल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे या इफ्तार पार्टीची सुरुवात गणपती आणि माती दुर्गा देवीची आरती करुन करण्यात आली. त्यामुळे, या इफ्तार पार्टीला मी हजर राहिलो, असेही त्यांनी सांगितलं.
काल आयुष्यत पहिल्यांदा इफ्तार पार्टी ला गेलो... मुस्लिम समाजातील रीती रिवाज माहिती करून घ्यावेत असे अनेकदा वाटते.
— Asim Sarode (@AsimSarode) April 25, 2022
इफ्तार पार्टीला जाण्याचे कारण वेगळे होते... या पार्टीची सुरुवात मुस्लिम समाजातील काही लोक गणपती, दुर्गादेवी यांची पूजा करून करणार होते. pic.twitter.com/YgjCprdM0F
''काल आयुष्यत पहिल्यांदा इफ्तार पार्टी ला गेलो. मुस्लिम समाजातील रीती रिवाज माहिती करून घ्यावेत असे अनेकदा वाटते. इफ्तार पार्टीला जाण्याचे कारण वेगळे होते. या पार्टीची सुरुवात मुस्लिम समाजातील काही लोक गणपती, दुर्गादेवी यांची पूजा करून करणार होते.'', असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच, या आरतीचा व्हिडिओही शेअर केला आहे.
नास्तिक मेळाव्यावरही केलं भाष्य
पोलिसांनी १० एप्रिलच्या मेळाव्याला मनाई करण्याचे कारण काय, तर त्यादिवशी रामनवमी असल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील अशी तक्रार पोलिसांकडे आली होती. समाजाच्या धार्मिक भावना मोठ्या तरल असतात आणि त्या फट म्हणता दुखावतात, असा एक सर्वसाधारण समज आहे. मग रामनवमीनंतर दोन आठवड्यांनी या भावना बधिर किंवा बोथट झाल्या असे समजायचे का? मेळाव्यात झालेली भाषणे चिथावणी देणारी, प्रक्षोभक किंवा देव-देवतांची टिंगल-टवाळी करणारी असती तर धार्मिक भावना दुखावल्या जायला किंवा शांतता भंग करायला कारणीभूत ठरली असती; पण या मेळाव्याचे वातावरण तर एकदमच वेगळे होते.