अग्निशमन जवानांना अवमानाची ‘धग’, केंद्राच्या आदेशाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 06:25 AM2018-06-06T06:25:51+5:302018-06-06T06:25:51+5:30

कडक गणवेशात आपत्तीचा सामना करण्यासाठी कायम सज्ज असलेल्या अग्निशमन दलातील जवानांचा पदाधिकारी व प्रशासनाकडून सातत्याने अवमान केला जात आहे.

Ignorance of firefighters, ignore the orders of the Center | अग्निशमन जवानांना अवमानाची ‘धग’, केंद्राच्या आदेशाकडे दुर्लक्ष

अग्निशमन जवानांना अवमानाची ‘धग’, केंद्राच्या आदेशाकडे दुर्लक्ष

googlenewsNext

पुणे : कडक गणवेशात आपत्तीचा सामना करण्यासाठी कायम सज्ज असलेल्या अग्निशमन दलातील जवानांचा पदाधिकारी व प्रशासनाकडून सातत्याने अवमान केला जात आहे. या जवानांना अन्य कामे सांगू नयेत, असा थेट केंद्र सरकारचा आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यावरील चिखल स्वच्छ करणे किंवा पावसाने पडलेली झाडे उचलून रस्ता मोकळा करून देणे अशी कामे या जवानांनी करणे अपेक्षित धरले जात आहे. अशी कामे केली नाही म्हणून अग्निशमन दलप्रमुखांवर कारवाई करा, त्यांची पात्रता तपासा, अशी मुक्ताफळं काही सदस्यांनी थेट सर्वसाधारण सभेत उच्चारली आहेत. त्यामुळे या विभागातील जवानांमध्ये संतप्त भावना असून, या अवमानाची धग या जवानांना चांगलीच जिव्हारी लागत आहे.
केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना एक आदेश लागू केला गेला आहे. त्यानुसार अग्निशमन सेवा ही अत्यावश्यक सेवा समजण्यात आली आहे. अग्निशमन व आणीबाणी सेवा असेच तिचे नामकरण करण्यात आले आहे. रस्ते धुणे, सासफाई करणे, पाणीपुरवठा करणे अशा प्रकारची कामे या विभागातील जवानांना सांगितली जातात. त्याचीच दखल केंद्र सरकारच्या या आदेशात घेण्यात आली आहे. या प्रकारची कामे अग्निशमन दलाच्या जवानांना सांगू नयेत, असे ठळकपणे या आदेशात बजावण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेवरून राज्यपालांच्या नावाने हा आदेश राज्य सरकारने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सन २००७ मध्ये पाठवला आहे. त्याचे पालन केले नाही, तर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही या आदेशात स्पष्ट शब्दांत नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही प्रशासनाकडून मात्र त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून अग्निशमनसेवेतील जवानांनी कोणतीही कामे करावीत, अशी अपेक्षा ठेवली जात आहे.

प्रशासनाचे विभागाकडे दुर्लक्ष
प्रशासनाचे या विभागाकडे दुर्लक्ष असल्याचेच दिसते आहे. पदाधिकाऱ्यांनी हा विभाग अद्ययावत करण्यात काही रस नाही असेच दिसते आहे. ३५ लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात किमान ३० अग्निशमन केंद्र असण्याची गरज आहे. प्रत्यक्षात ती फक्त १३ आहे, तसेच २ तयार आहेत; पण ती केंद्रे सुरू झालेली नाहीत. ४ केंद्रांची बांधकामे रखडली आहेत. ९५० जवान अपेक्षित व पदमान्यताही असताना फक्त ४५० जण आहेत. त्यात अधिकाºयांपासून चालकांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे.

चिखल साफ करण्याची अपेक्षा
हडपसर परिसरात माती वाहणाºया मालमोटारीतून माती रस्त्यावर पडली. त्यात पाणी सांडले. त्याचा चिखल झाला. तो स्वच्छ करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसहित पुढाकार घेतला,
मात्र मदतीला अग्निशमन दलाचे जवान यावेत अशी अपेक्षा धरली. दलप्रमुखाने स्पष्ट शब्दांत नाही, असे सांगितल्यावर लगेचच संपूर्ण विभागावरच राग काढला गेला.

चालकही फायर फायटर नाही
केंद्राच्या नियमाप्रमाणे चालकही फायर फायटिंगचे प्रशिक्षण घेतलेला असणे गरजेचे आहे. मात्र वाहन विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात गरज म्हणून दिलेल्या चालकांमध्ये कोणाचेही या प्रकारचे कोणतेही प्रशिक्षण झालेले नाही.

...आम्ही काय माळी आहोत का ?
पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर झाड पडल्याच्या दुर्घटना होतात. एखादी फांदी पडते किंवा संपूर्ण झाडच उन्मळून रस्त्यावर येते. अशा घटनांमध्ये रस्त्यावरची फांदी किंवा झाड काढण्याचे काम उद्यान विभागाचे आहे. त्यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र वाहने, स्वतंत्र कर्मचारी आहेत. मात्र तरीही या कामातही अग्निशमन दलाची मदत घेतली जाते. त्यांच्या जवानांना रस्ता मोकळा करून देण्यास सांगण्यात येते. आले नाहीत तर त्यांच्यावर टीका होते.
पावसाळ्यात तर रोजच संध्याकाळी किंवा रात्री उशिरा हे काम अग्निशमन दलाचे जवानच करीत असतात. उद्यान विभागाने पावसाळ्यात काही कर्मचारी व वाहने रात्रपाळीकरिता ठेवली तरी त्यांच्याकडून हे काम होऊ शकते, मात्र तेही करायला प्रशासन तयार नाही.
अग्निशमन दलाच्या जवानांनाच त्यासाठी पाचारण केले जाते, रस्ता मोकळा करून द्यायला आम्ही वाहतूक शाखेचे आहोत की वृक्षांची निगराणी करणारे माळी आहोत, असे जवानांचे म्हणणे आहे.

वर्दी आली, की धावून जायचे हे अग्निशमन विभागाचे काम आहे, मात्र रस्त्यांवरील चिखल धुऊन काढण्यासाठी हा विभाग नाही. त्यामुळे सरकारच्या आदेशाप्रमाणे त्यावेळी नकार दिला. झाडपडीच्या घटनांमध्ये रात्री उशिरा काही घडले तर वर्दी येते व जावे लागते.
- प्रशांत रणपिसे,
अग्निशमन दलप्रमुख

Web Title: Ignorance of firefighters, ignore the orders of the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.