चातुर्वर्ण्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष : दिशा केने-शेख; पुण्यात तेजस्विनी चिंतन परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:28 PM2018-02-23T12:28:24+5:302018-02-23T12:31:20+5:30
सामाजिक दबावामुळे काम करून घर सांभाळणे ही मानसिकता तयार झाली असल्याने निर्भयासारख्या घटना घडतात, असे मत सामाजिक कार्यकर्त्या दिशा केने-शेख यांनी व्यक्त केले.
लोणी काळभोर : आजच्या काळात पुरोगामित्वाचा कितीही आव आणला जात असला, तरी चातुर्वर्ण्याच्या प्रभावामुळे स्त्रियांचे प्रश्न दुय्यम मानले जात आहेत. सामाजिक दबावामुळे काम करून घर सांभाळणे ही मानसिकता तयार झाली असल्याने निर्भयासारख्या घटना घडतात, असे मत सामाजिक कार्यकर्त्या दिशा केने-शेख यांनी व्यक्त केले.
मराठी साहित्य परिषद (पुणे जिल्हा शाखा), तेजस्विनी संस्था व राज्य युवा परिषदेच्या वतीने तेजस्विनी चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कावेरी कुंजीर अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. अलका नाईक, शुभालिनी देसाई, मंजूश्री साबू या वेळी उपस्थित होत्या.
दिशा शेख म्हणाल्या, माता, भगिनी, पत्नी, कन्या, सखी, आदी रूपांत स्त्रीने मानवी जीवनांत आपले अलौकित्व सिद्ध केले आहे. त्याअनुषंगाने त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व व सामर्थ्य खऱ्या अर्थाने समोर येत आहे. असे असतानाही स्त्रीला आजही एक वस्तू समजले जाते. अर्धांगी हा शब्द नावाला आहे. लग्न ठरवताना मुलगी सामाजिक दबावामुळे होकार देते व अनोळखी व्यक्तीसमवेत लग्न करते. आपण उघड बलात्काराबद्दल बोलतो; परंतु पतीबरोबरचा पहिला संभोगदेखील बलात्कारच असतो हे आपण विसरतो. बलात्कार कपड्यांनी नाही तर मानसिकतेतून होतो व त्यातूनच दिल्ली, खैरलांजी, कोपर्डीसारख्या घटना घडतात. अशा घटना घडू नयेत म्हणून यापुढे पुरुषांच्या मानसिकतेचा अभ्यास करून हुकूमशाही समजून घ्यावी लागणार आहे.’ पाहुण्यांची ओळख गणेश सातव यांनी करून दिली. राजकुमार काळभोर यांनी आभार मानले.