औद्योगिक क्षेत्रामधील अपघाताकडे दुर्लक्ष
By Admin | Published: October 13, 2016 02:12 AM2016-10-13T02:12:37+5:302016-10-13T02:12:37+5:30
येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक उत्पादन करणाऱ्या विविध कारखान्यांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत प्रशासन कमालीचे
कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक उत्पादन करणाऱ्या विविध कारखान्यांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत प्रशासन कमालीचे निर्ढावल्याचे चित्र आहे. मंगळवारी संध्याकाळी पटनी फोमस या कंपनीला लागलेल्या भीषण आगीमध्ये पूर्ण कंपनी जळून खाक झाली. मात्र, त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उडालेली तारांबळ पाहता, कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील कामगार तसेच परिसरात असणाऱ्या कुरकुंभ, पांढरेवाडी तसेच अन्य जवळपास असणाऱ्या नागरिकांचे भविष्य धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पटनी फोमस या कंपनीमध्ये गाद्यांमध्ये वापरण्यात येणारे फोम बनवले जाते. अगदीच वीसच्या जवळपास कामगार असणारी ही कंपनी सामान्यत: कुठल्याही प्रकारचा धोका न संभवणारी अशी ही कंपनी असल्याचा गैरसमज हा मंगळवारी लागलेल्या आगीमुळे दूर झाला. आग विझविण्यासाठी प्रथम कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील अग्निशामक दलाला पाचारण केले.
मात्र, त्याच्या क्षमतेच्या पलीकडे असणाऱ्या भीषण आगीला विझविण्यासाठी जवळपास ५ अग्निशामक गाड्यांचा वापरदेखील कमी पडत होता. तर, रिकाम्या झालेल्या अग्निशामक गाड्यांमध्ये पाणी मिळविण्यासाठी फायर हायड्रन्ट लाईनदेखील जवळपास नसल्यामुळे अडचणीत आणखी भर पडत गेली.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक पदार्थ उत्पादन करणारे देशातील एक महत्त्वपूर्ण स्थान मानले जाते. मोठमोठ्या उद्योगसमूहांचे या ठिकाणी कारखाने आहेत. वीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचे, वायूचे प्रदूषण येथील ग्रामस्थ सोसत आहेत. मात्र, अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या स्फोट व आग लागण्याच्या समस्येमुळे एक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. (वार्ताहर)