तरुण पिढीचे विधायक कामात दुर्लक्ष : गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 06:27 PM2018-12-05T18:27:36+5:302018-12-05T18:28:17+5:30
आपल्या संस्कृतीविषयी आणि संस्कारांविषयी जाणून घेण्यापेक्षा सध्याच्या युवकांना कट्टयावर बसायला अधिक आवडते. यामध्ये परिवर्तन घडायला हवे.
पुणे : आपल्या संस्कृतीविषयी आणि संस्कारांविषयी जाणून घेण्यापेक्षा सध्याच्या युवकांना कट्टयावर बसायला अधिक आवडते. यामध्ये परिवर्तन घडायला हवे. तरुण पिढी सध्या विधायक कामाकडे दुर्लक्ष करताना दिसते. परंतु, तरुणांनी व्यक्ती, संस्थांच्या कार्यातून स्फूर्ती, प्रेरणा घेऊन सामाजिक काम करण्याची गरज आहे, असे मत पालकमंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केले.
पुणे प्रार्थना समाजाच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बापट यांच्यासह संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे, ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे डॉ. प्रकाश तुपे, अनिरुद्ध देशपांडे, मानव्य संस्थेचे शिरीष लवाटे, रमेश चव्हाण, निवृत्त एअर कमोडोर अशोक शिंदे, भरत शहा, पुणे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष एअर कमोडोर (निवृत्त) अशोक शिंदे, संस्थेचे चिटणीस प्रा. डॉ. दिलीप जोग, सहचिटणीस सुषमा जोग, डॉ. दत्तात्रय लाटे, समीर चौधरी, अनुराधा शिंदे उपस्थित होते.
यावेळी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार ज्योतिर्विद्या परिसंस्थेला, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार रमेश चव्हाण व डेव्हिडा रॉबर्टस पुरस्कार मानव्य या संस्थेला प्रदान करण्यात आला. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार हा पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार करणाऱ्या संस्थेस देण्यात येतो. समाजातील विविध घटकांमध्ये सामंजस्याचे काम करणाºया व्यक्तीला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार देण्यात येतो. डेव्हिडा रॉबर्टस पुरस्कार विशेष बालकांसाठी कार्य करणाºया संस्थेला देण्यात येतो. यावेळी गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना प्राचार्य वि.के. जोग, गुरुवर्य बा.ग. जगताप, सुयोग आणि कलोपासना पुरस्कृत लक्ष्मीबाई प्रतापराव शिंदे शिष्यवृत्ती देण्यात आल्या.
प्रा. डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘आधुनिक भारताच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, विद्वत्तेच्या क्षेत्रात प्रार्थना समाजाचे खूप मोठे योगदान आहे. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांसारख्या दिग्गज लोकांनी प्रार्थना समाजासाठी खूप मोठे कार्य केले आहे. प्रार्थना समाजाचे महाराष्ट्रावर आणि भारतावर खूप मोठे ऋण आहे. सुषमा जोग यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्तात्रय लाटे यांनी आभार मानले.