वडिवळे धरणाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष
By Admin | Published: April 10, 2017 02:29 AM2017-04-10T02:29:00+5:302017-04-10T02:29:00+5:30
मावळ तालुक्यातील महत्त्वाच्या वडिवळे धरणाची भिंत खराब झाली आहे. धरणाचा पायाही कमकुवत होत आहे.
करंजगाव : मावळ तालुक्यातील महत्त्वाच्या वडिवळे धरणाची भिंत खराब झाली आहे. धरणाचा पायाही कमकुवत होत आहे. धरणाच्या दुरवस्थेकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षच होत असल्याची तक्रार केली जात आहे.
पाणी सोडले जाते त्या ठिकाणी पायाचे सिमेंट निघून चालले आहे. त्यामधील तारा, गज दिसू लागले आहेत. पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे आतील तारेला गंज लागण्याची शक्यता आहे. धरणाच्या पायथ्याच्या मध्यभागी पाणी सोडण्यासाठी चावीचा वापर केला जातो. तेथे जाण्यासाठी लोखंडी जिण्याला धरून जावे लागते. सुमारे ४५ फूट उंचीचा हा जिना गंजून मोडकळीस आला आहे. पाणी सोडण्यासाठी तेथून कामगारांना जोखीम पत्करूनच जावे लागते.
धरणाच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर आतील पाया दुरुस्त करण्यात आला आहे. परंतु, बाहेरची भिंत, पाया दुरुस्तीसाठी कोणतीच पाऊले उचलण्यात आली नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
धरणाचा कालवा करंजगाव, गोवित्री, साबळेवाडी, कांबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नाणे, कोळवाडी व इतर गावांतून गेला आहे. या कालव्याच्या पाण्यावर दोन दशकांपूर्वी प्रत्येक शिवार हे हिरवेगार-सुजलाम-सुफलाम होते. परंतु, सध्या कालवा असूनही पाणी वेळेवर मिळत नाही. काही गावांना कालव्याचे पाणी बंद झाले आहे. कालवा बंद झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी काही ठिकाणी कालवा पूर्णपणे बुजवला असून, तेथे शेती केली जाते. कालवा काही ठिकाणी नादुरुस्त झाला असून, पाणीगळती होत आहे.
धरण असूनही काही गावांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतीही ओसाड झाली आहे. अनेकांना नाईलाजाने वर्षात एकच पीक घ्यावे लागते. शेतीसाठी पावसाळ्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नसतो. पूर्वीप्रमाणे कालवा सुरू होण्याची शेतकऱ्यांना दोन दशके प्रतीक्षा आहे.
राज्यात दुष्काळग्रस्त भागात चारा-पाण्यासाठी जनावरांची छावनी सुरू केली जाते. येथे पाणी असूनही ते व्यवस्थीत मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. धरणावर विद्युतविषयक समस्याही अनेक वर्षांपासून सोडविल्या गेलेल्या नाहीत. फ्यूज, डीपी, वायर, बोर्ड, बटन खराब अवस्थेत आहे. काही ठिकाणी होल्डरला बल्ब नाही. वायर लोंबत आहेत. (वार्ताहर)
पाण्याचे नियोजन : दुरुस्तीची कामे होणे आवश्यक
नाणे मावळातील वडिवळे धरण १.४४ टीएमसी क्षमतेचे आहे. या धरणाची निर्मिती १९७८ मध्ये करण्यात आली. धरणाची पाणीसाठा क्षमता ४०.८७ दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त पाणीसाठा ३०.३९ दशलक्ष घनमीटर आहे. धरणाचा कालवा व नदीपात्राद्वारे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकासाठी सुमारे सहा हजार हेक्टर पाणलोट क्षेत्र आहे. त्यामुळे नाणे मावळ व आजुबाजूचा काही ठिकाणचा परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रांसाठी येथून पाणीपुरवठा होतो.
धरणातील पाणी इतर गावांना सोडण्यासाठी कालव्याचा वापर केला जातो. या कालव्यालगत अनेक छोटी-मोठी झुडपे आहे. माळरानातून येणारी माती कालव्यामध्ये पडत आहे. कालवा व्यवस्थित करून पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. धरणावरील इतर दुरुस्तीची कामे करुन सुविधा पूर्ण क्षमतेने आणि सुरक्षितपणे उपलब्ध करुन देण्याची नागरिकांची मागणी आहे. नाणे मावळातील शिवारात पाणी देण्यासाठीच्या जलवाहिनीचे काम अर्धवट आहे. हे काम पूर्ण होण्याची शेतकरी वाट पाहत आहेत.