महामार्ग सुरक्षेकडेच दुर्लक्ष
By Admin | Published: July 5, 2017 02:40 AM2017-07-05T02:40:55+5:302017-07-05T02:40:55+5:30
सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे-नगर महामार्गाच्या दुरवस्थेकडे वारंवार सांगूनही दुर्लक्ष करीत असल्याने लोणी कंद येथे झालेल्या अपघाताला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाघोली : सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे-नगर महामार्गाच्या दुरवस्थेकडे वारंवार सांगूनही दुर्लक्ष करीत असल्याने लोणी कंद येथे झालेल्या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागदेखील कारणीभूत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिक व चालकवर्गातून येऊ लागल्या आहेत. सध्या महामार्गावरील रस्त्यांची अवस्था पाहून वाहनचालक व प्रवाशांना अक्षरश: जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत असल्याने आता तरी महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष देणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सम्राट अशोक रोड असे नामकरण असलेल्या पुणे-नगर महामार्गावर २००५मध्ये वाघोली ते शिरूरपर्यंत ५३ किलोमीटरच्या रस्त्याचे बीओटी तत्त्वावर चौपदरीकरण करण्यात आले. २०१४मध्ये न्यायालयाच्या आदेशाने पेरणे फाटा येथील टोलनाका बंद करण्यात आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागाने संपूर्ण रस्त्याची देखभाल करण्यास सुरुवात केली. कंत्राटदाराने देखभालीचे काम बंद केल्याने बांधकाम विभागाकडे जबाबदारी आल्यानंतर पुणे-नगर महामार्गाच्या दुरवस्थेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
या महामार्गावर वाहनांची वाढलेली वर्दळ आणि रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तोकडा निधी असल्याने तात्पुरती मलमपट्टी मागील तीन वर्षांपासून केली जात होती. आजतागायत तशाच पद्धतीची मलमपट्टी केली जात आहे.
सद्यस्थितीत महामार्गाच्या कडेला व मुख्य रस्त्याच्या चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंग व पांढरे पट्टे नाहीत. मुख्य चौकामध्ये पांढरे पट्टे मारण्याची वारंवार विनंती करूनही अद्यापही याकडे लक्ष दिले जात नाही. त्याचबरोबर अत्यंत गरजेचे असणारे दिशादर्शक व नामफलक लावले गेले नाहीत. अनेक ठिकाणी पाणी जाण्यासाठी असणारे ओढे, नाले बुजलेले असल्याने पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचण्याचे प्रकार सर्रासपणे होतात. वाघोली परिसरामध्ये वाहतूककोंडीमुळे मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले होते, परंतु आजतागायत अनेक ठिकाणी निकृष्ट व अर्धवट कामे सोडल्याने वाहनचालकांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण केली आहे. रस्तादुभाजकावर लावलेले फ्लेक्स व महामार्गाच्या कडेला उभे केलेल्या फ्लेक्सकडे बांधकाम विभाग कायमस्वरूपी दुर्लक्ष करीत आला आहे. वाहनांचे लक्ष विचलित करणाऱ्या फ्लेक्सबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही. मुख्य रस्त्याच्या १३ मीटर आतील वारंवार होणाऱ्या अतिक्रमणांवर ठोस कारवाई केली जात नाही.
महामार्गाच्या सध्या झालेल्या दुरवस्थेबद्दल बांधकाम विभागाला वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. भरधाव वेगाने येणारा टँकर सहजरीत्या दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला गेल्याने सात जणांना नाहक बळी पडावे लागले, त्यामुळे लोणीकंद येथे झालेल्या अपघाताला टँकरचालकाबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागही तितकाच जबाबदार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. महामार्गाच्या दुरवस्थेकडे जागतिक बँक प्रकल्प विभागाने आता तरी लक्ष द्यावे व दुरवस्थेमुळे पडणारे हकनाक बळी थांबवावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
रस्त्याकडे कमी ‘छपाई’कडे जादा लक्ष
पुणे-नगर महामार्गाची जबाबदारी असणाऱ्या जागतिक बँक प्रकल्प विभागातील उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व लिपिकाचे रस्त्याच्या दुरवस्थेची तक्रार करणाऱ्यांकडे कमी पण महामार्गाच्या रस्त्याच्या शेजारी खोदकामाची परवानगी मागण्यासाठी येणाऱ्यांकडे सर्वाधिक लक्ष असते. खोदकाम करण्याची परवानगी मागणाऱ्यांकडून आर्थिक तडजोड मोठ्या प्रमाणात केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. पुणे-नगर महामार्गावर दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी आलेल्या या अधिकाऱ्यांचे दर्शन ग्रामस्थांना क्वचितच होते.
दुभाजकांची उंची वाढविणे गरजेचे
वाघोलीपासून सुरु होणाऱ्या या महामार्गाच्या रस्ता दुभाजकाची सर्वाधिक दुरवस्था झाली आहे. दुभाजकावरील लाईट कटिंग बॅरिअर अवघ्या मोजक्याच ठिकाणी सुस्थितीत आहेत. रात्रीच्या वेळी वापरात येणारे लाईट रिफ्लेक्टर खराब झाले आहेत.
संपूर्ण रस्त्यावर उतार असणाऱ्या वळणावर दुभाजकांच्या शेजारी मातीचे ढिगारे निर्माण झाले आहेत. दुभाजकांची कमी असलेली उंची आणि मातीच्या ढिगाऱ्यामुळे महामार्गाच्या एका बाजूला वेगात असणारे वाहन सहजरीत्या दुसऱ्या बाजूला जाते.
दुचाकीचालकांना या मातीचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. दुभाजकाच्या कडेला असणाऱ्या मातीची वेळच्या वेळी साफसफाई करण्याची तसदीदेखील बांधकाम विभागातर्फे घेतली जात नाही. यामुळे साफसफाईबरोबरच दुभाजकांची उंची वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.
महामार्गाच्या दुरवस्थेतील मुख्य मुद्दे
रस्ता दुभाजकांची दुरवस्था
लाईट कटिंग बॅरिअरची दुरवस्था
झेब्रा क्रॉसिंग व पांढरे पट्टे मारले गेले नाहीत
रस्त्याच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम
दिशादर्शक फलकांचा अभाव
बुजलेले ओढे, नाल्याकडे दुर्लक्ष
महामार्गालगतच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष
वाहनांचे लक्ष विचलित करणाऱ्या फ्लेक्सची संख्या वाढली