निवडणुकीत निष्ठावंतांची उपेक्षा
By admin | Published: December 26, 2016 04:06 AM2016-12-26T04:06:49+5:302016-12-26T04:06:49+5:30
राजकीय पक्षांचे वॉर्ड अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवपदांवर अनेक कार्यकर्ते निष्ठेने वर्षानुवर्षे काम करीत राहतात, पक्षाकडून कधी
पुणे : राजकीय पक्षांचे वॉर्ड अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवपदांवर अनेक कार्यकर्ते निष्ठेने वर्षानुवर्षे काम करीत राहतात, पक्षाकडून कधी तरी किमान निवडणूक लढण्याची संधी मिळेल याची वाट ते पाहत आहेत. मात्र तिकीटवाटपाच्या वेळी अचानक पक्षात आलेल्या बिल्डर, इतर व्यावसायिक किंवा आयात नगरसेवकांना प्राधान्य देऊन कार्यकर्त्याची अवहेलना केली जात आहे. राजकीय पक्षांकडून सामान्य कार्यकर्त्यांच्या वाट्याला अशी सातत्याने उपेक्षा येऊ लागल्याने आता निष्ठावान कार्यकर्ते ही जमातच दुर्मिळ होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये हे चित्र दिसून येत आहे.
गणेश मंडळाचा पदाधिकारी म्हणून काम पाहता पाहता, तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता कधी बनून जातो, हे त्यालाच समजत नाही. आपल्या भागातील ओळखीच्या नेत्याला मदत करण्यासाठी म्हणून तो राजकारणात उतरतो. काही वर्षे पक्षात काम केल्यानंतर त्याला पक्षाकडून वॉर्ड अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव अशी पदेही दिली जातात. ही पदे मिळाल्यावर कार्यकर्ता चांगलाच हुरळून जातो. त्याला त्याच्या पक्षाचा चांगलाच अभिमान वाटू लागतो. मोठ्या हिरीरीने तो पक्षसंघटनेच्या कामाला झोकून देतो. मात्र पक्षाकडून उमेदवारी देण्याची वेळ आली, की मात्र निष्ठावान कार्यकर्त्यांऐवजी दुसऱ्याच उपऱ्या व्यक्तीला संधी दिली जात असल्याचे चित्र सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमी-अधिक फरकाने दिसून येत आहे.
मध्यवस्तीमध्ये एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता, वॉर्ड अध्यक्ष म्हणून गेल्या २५ वर्षांपासून काम करीत असलेला एक पदाधिकारी म्हणाला, ‘‘पक्षाकडून कामाची दखल घेतली जाईल, या भावनेने अनेक वर्षांपासून काम करीत राहिलो. पक्षसंघटना वाढविण्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेतली. आता जेव्हा पक्षाला चांगले दिवस आले तेव्हा अचानक विरोधी पक्षातील विद्यमानाला पक्षात घेण्याची चर्चा ऐकतोय. ज्यांच्या विरोधात पक्ष वाढविला, त्यांचाच हातात आता पक्ष देण्याचे चालले आहे.’’
पक्षासाठी इमानेइतबारे काम करणारे अनेक कार्यकर्ते असतात. मात्र त्यांच्याकडे पक्षनेत्यांचे दुर्लक्षच
होते. तो केवळ कार्यकर्ता म्हणून
काम करण्यासाठीच पक्षात आला आहे, अशीच वागणूक मिळत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी
व्यक्त केली.
(प्रतिनिधी)