खड्डा बुजविण्याकडे दुर्लक्ष; अभियंत्यांसह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 02:13 AM2018-11-16T02:13:46+5:302018-11-16T02:14:02+5:30
अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू : मुंढवा पोलिसांची थेट महापालिकेवरच कारवाई
पुणे : जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर पडलेला खड्डा व्यवस्थित बुजवा, अशी पोलिसांनी सूचना देऊन महापालिकेने दुर्लक्ष केले़ याच खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला़ या प्रकरणी पोलिसांनी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता, ठेकेदार व सुपरवायझर अशा तिघांना अटक केली आहे़
कनिष्ठ अभियंता इंद्रजित वसंतराव देशमुख (वय २७, रा़ निखिल गार्डन अपार्टमेंट, सिंहगड रोड) , ठेकेदार शाहू शेषराव काकडे (वय ४५, गिरीसंस्कृती, हांडेवाडी रोड, हडपसर) आणि सुपरवायझर उत्तरेश्वर मोहन नरसिंगे (वय ३३, तरवडेवस्ती, महंमदवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ अपघाताला जबाबदार धरून महापालिकेच्या अभियंत्याला अटक होण्याची पहिलीच घटना आहे. या अपघातात रशीद रुस्तुम इराणी (वय ६०, रा. सरबतवाला चौक, दस्तुर मेहेर रोड, कॅम्प) यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी सांगितले की, बोटॅनिकल गार्डन रस्त्यावर जलवाहिनीची गळती झाली होती़ महापालिकेने ठेकेदारामार्फत खोदकाम करून ती दुरुस्ती केली़ मात्र, तेथील खड्डा समतोल न करता माती टाकून बुजविला होता़ रुस्तम इराणी यांचे हॉटेल आहे़ ते बुधवारी सकाळी दुचाकीवरून जात असताना या मातीच्या ढिगाऱ्यावरून त्यांची दुचाकी घसरली व खाली पडले़ त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला़
अपघाताचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित वाळके यांच्याकडे सोपविण्यात आला होता़ १२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता पोलीस नाईक अभिजित उगले हे रात्री गस्त घालत होते़ त्यावेळी बोटॅनिकल गार्डनजवळ रस्त्यावर खोदकाम सुरू होते़ उगले यांनी चौकशी केल्यावर तुम्ही सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नाही़ काम करताना फ्लोरेसन्ट जॅकेट घातले नाही़ वाहतूक डायव्हरशन करण्यासाठी लाईट बॅटनचा वापर करीत नाहीत, हे निदर्शनास आणून दिले. काम झाल्यावर रस्ता व्यवस्थित बुजविण्यास सांगितले़ काम झाल्यावर बॅरिकेट लावण्यास सांगितले होते़ मात्र, बॅरिकेट न लावल्याने अपघात होऊन इराणी यांचा मृत्यू झाल्याने गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे़
जुलैमध्ये असाच झाला होता अपघात
महापालिकेकडून रस्त्यावर केल्या जाणाºया कामाच्या वेळी योग्य सुरक्षा घेतली जात नाही़ काम झाल्यानंतर रस्ता दुरुस्त केला जात नाही़ त्यामुळे अनेकदा अपघात होतात़ मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुलै महिन्यात पिंगळे वस्ती ते ताडीगुत्ता चौक दरम्यान असाच अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला होता़ पण, त्यावेळी तेथील खड्ड्यामुळेच अपघात झाला, हे सिद्ध होईल इतका पुरावा मिळाला नव्हता़
- अनिल पात्रुडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस