राज्यकर्त्यांचे लोककलाकारांकडे दुर्लक्ष
By admin | Published: May 24, 2017 03:54 AM2017-05-24T03:54:10+5:302017-05-24T03:54:10+5:30
प्रभाताई शिवणेकर म्हणाल्या, ‘‘पुणे महापालिकेच्या वतीने पठ्ठे बापूराव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा केवळ माझा सन्मान नसून लोककलेचा सन्मान आणि तमाशा कलेचा सन्मान आहे
प्रभाताई शिवणेकर म्हणाल्या, ‘‘पुणे महापालिकेच्या वतीने पठ्ठे बापूराव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा केवळ माझा सन्मान नसून लोककलेचा सन्मान आणि तमाशा कलेचा सन्मान आहे. एका तमाशा कलावंतास पठ्ठे बापूराव यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. हा जीवनातील सर्वांत मोठा सन्मान आहे, असे मला वाटते. मी मूळची बेळगावची. परंतु, लहानपण मुळशी तालुक्यातील बालगुडी परिसरात गेले. नऊ वर्षांची होते त्या वेळी आई-वडील देवाघरी गेले. पुढे बहिणीने माझा सांभाळ केला. लहानपणी गाई-म्हशी वळणे, घरातील कामे करणे, लाकडाच्या मोळ्या वाहने ही कामे केली. बारा वर्षांची असताना दादू इंदुरीकरसह शंकर शिवणेकर यांच्या तमाशात काम करायला सुरुवात केली. गवळणीत काम करू लागले. तसेच गाणी म्हणने आणि वगातही भूमिका साकारायला सुरुवात झाली. मला आठवतयं पहिला वग ‘लड्डूसिंग’ होता. त्यानंतर ‘मराठी शाहीची बोलकी’, ‘मल्हारराव होळकर’ अशा वगांत कामे करायला सुरुवात केली. त्यात छोट्यामोठ्या भूमिका साकारायला सुरुवात झाली.
खरे तर तमाशात काम करण्याचा कोणताही अनुभव नाही. शिक्षण नाही. मला कला क्षेत्रात घडविण्यात दादू इंदुरीकर यांचे योगदान आहे. गाणी कशी म्हणायची, नृत्य कसे करायचे. अभिनय कसा करायचा हे शिकविले. त्यानंतर आलेल्या झाशी च्या राणीमधून झाशीच्या राणीची मुख्य भूमिका केली. त्यातून मला खूप लोकप्रियता मिळाली. तमाशात खूप बदल झाला आहे. कालचा तमाशा आणि आजचा तमाशा खूप वेगळाच आहे. गावात डबडी वाजवून तमाशाची दवंडी दिली जायची. त्यानंतर गावातील मोकळ्या जागेत दगडांचा उंचवटा करून त्यावर माती टाकून त्यावर तमाशा सादर व्हायचा. आजच्या सारखा झगमगाट त्या काळी नव्हता. पूर्वीचा तमाशा वगनाट्य प्रधान होता, आताचा तमाशा संगीत प्रधान आहे. काळ बदलला तशी आवडही बदलली.
जीवनाला खरी कलाटणी मिळाली ती दादू इंदुरीकराच्या ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यातून या वगनाट्यात सावळा कुंभाराबरोबरच गंगीचीही भूमिका महत्त्वाची आहे. गंगीची भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी केला. या वगनाट्यास मोठी लोकप्रियता मिळाली. प्रभा शिवणेकर आणि गंगी असे समीकरण बनले. या वगनाट्याचे सुमारे वीस वर्षे हजारो प्रयोग केले. त्यातून मनोरंजनाबरोबरच समाजाचे प्रबोधन करण्याचेही काम केले.’’
‘‘लोककलांची अवस्था काय आहे, हे आपण सर्वच जण जाणतो आहोत. महाराष्ट्रातील संस्कृतीला एकसंध ठेवण्याचे काम लोककलांनी केले आहे. लोककलांनी महाराष्ट्राचे मनोरंजनच केले नाही, तर दिशा देण्याचे कामही केले आहे. त्यात तमाशा कलेचे योगदान मोलाचे आहे. या कलेची आजची परिस्थिती काय? तमाशाचे फड चालविणेही कठीण झाले आहे. कोणी तमाशात काम करायला तयार होत नाही. तमासगीरांनाही आपली मुलं, तमाशात काम करावी, असे वाटत नाही. त्यामुळे कलांचा ऱ्हास होणार नाही, याची दक्षता समाज, राजकारणी, शासनाने घ्यायला हवा. संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत. कलाकारांना कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये. कोणताही उद्देश न ठेवता कला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या कलावंतांची कदर शासनाने करायला हवी. तरच कला आणि कलाकार टिकतील, असेही शिवणेकर म्हणाल्या.