ध्वनिप्रदूषणाकडे दुर्लक्ष
By admin | Published: April 26, 2017 04:23 AM2017-04-26T04:23:21+5:302017-04-26T04:24:37+5:30
पर्यावरण संवर्धन, जलप्रदूषण, वायुप्रदूषण अशा विविध गोष्टींबाबत जनजागृती वाढत चालली असताना ध्वनिप्रदूषण हा विषय मात्र
पुणे : पर्यावरण संवर्धन, जलप्रदूषण, वायुप्रदूषण अशा विविध गोष्टींबाबत जनजागृती वाढत चालली असताना ध्वनिप्रदूषण हा विषय मात्र साऱ्यांनीच वाळीत टाकलेला दिसत आहे. यासंबंधीचे नियम, कायदे असे सर्व काही केवळ कागदावरच असून त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होण्याची गरज आहे.
कोणत्या जागी किती ध्वनी असावा, यासंबंधीचे नियम थेट केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेले आहेत. त्यासाठी काही कायदेही आहेत. त्याचा भंग केला तर शिक्षा होते पण ती फक्त गणेशोत्सवात ध्वनिवर्धक लावला तरच किंवा रात्रीच्या सुमारास डीजे लावून कुठे गोंधळ सुरू असेल तरच. अन्य ठिकाणीही रोज सातत्याने ध्वनिप्रदूषण होत असते व त्याचाही त्रास होतो याचे भानही कोणाला नाही.
ध्वनिप्रदूषणासाठी मंडळाने दिवसाच्या २४ तासांचे काही भाग केले आहेत व काही निकषही तयार केले आहेत. त्यानुसार सकाळी ६ ते रात्री १० म्हणजे दिवस व रात्री १० ते सकाळी ६ म्हणजे रात्र. निवासी, व्यावसायिक, औद्योगिक व रुग्णालये, शाळा, न्यायालय असे ४ विभाग आहेत. तिथे दिवसा व रात्री किती डेसिबल (ध्वनिमापक) ध्वनी असावा, याचे नियम, निकष आहेत. त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याचे नियम मोडले व कोणी तक्रार केली तर संबंधितांवर कारवाईही होऊ शकते.
रुग्णालये, शाळा, न्यायालय या ठिकाणी दिवसा ५० डेसिबल व रात्री ४० डेसिबल ध्वनी असावा. निवासी ठिकाणी दिवसा ५५, रात्री ४५, व्यावसायिक ठिकाणी दिवसा ६५, रात्री ५५, औद्योगिक ठिकाणी दिवसा ७५ व रात्री ७० याप्रमाणे नियम करण्यात आले आहेत. मात्र त्याचे कोणीही पालन करताना दिसत नाही. महापालिकेने पर्यावरण विभाग नावाचा स्वतंत्र विभाग सुरू केला असून त्यांच्या वतीने पर्यावरण अहवालात दरवर्षी शहरातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाची दखल घेतली जाते. मात्र त्यावर पुढे काहीच होत नाही.
वाहनांच्या वाढत्या संख्येने शहरातील ध्वनिप्रदूषणात मोठी भर पडत आहे. सिग्नलच्या जवळ, सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी रोजच्या रोज ध्वनिप्रदूषण होत असते. किती मोठ्या डेसिबलचा आवाज कानांवर पडला तर त्याचा कानांना त्रास होतो, याचेही काही शास्त्रीय निकष तज्ज्ञांनी ठरवून दिले आहेत. सातत्याने मोठा आवाज कानांवर पडला तर कानाचा पडदा फाटून त्यातून बहिरेपण येण्याचीही शक्यता आहे. (प्रतिनिधी)
ध्वनिप्रदूषणाच्या दररोज १० तक्रारी-
पुणे : शहरात दररोज कोठे ना कोठे काहीना काही समारंभ, कार्यक्रम, विवाह तसेच धार्मिक कार्यक्रम सुरू असतात़ त्यासाठी मोठमोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावले जातात़ ते उशिरापर्यंत सुरू असतात़ त्याविषयीच्या ध्वनिप्रदूषणाच्या दररोज सरासरी किमान १० तक्रारी करणारे फोन पोलीस नियंत्रण कक्षाला येत असतात़
या फोनची दखल घेऊन नियंत्रण कक्षातून बीटमार्शलला संबंधित ठिकाणी पाठविले जाते़ त्यांच्याकडे ध्वनिप्रदूषण मोजणी यंत्र देण्यात आले आहे़ त्यावर ध्वनीची तीव्रता मोजून मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते़ यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली आहे़ रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी असली तरी त्या परिसरातील मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे फोनही येत असतात़
अनेकदा जागरण गोंधळ व रिसेप्शनसाठी उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर होताना दिसतो़ शनिवार, रविवारी अनेक ठिकाणी उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू असतात़ त्यामुळे मध्यरात्री २ वाजेपर्यंत फोन येत असतात़ (प्रतिनिधी)