Traffic Rules: मोडा नियम, चालवा गाडी; फक्त १० मिनिटांची परीक्षा द्या अन् पटकन वाहतूक परवाना घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 05:30 PM2022-04-14T17:30:39+5:302022-04-14T17:34:50+5:30

वाहतूक नियमांची चिन्हं ७० पेक्षा जास्त आहेत, तर नियम आहेत किमान ५० आणि या सगळ्याची परीक्षा फक्त १० मिनिटांत होते

ignore traffic rules drive car Just take a 10 minute exam and get a speeding license | Traffic Rules: मोडा नियम, चालवा गाडी; फक्त १० मिनिटांची परीक्षा द्या अन् पटकन वाहतूक परवाना घ्या

छायाचित्र - तन्मय ठोंबरे

googlenewsNext

राजू इनामदार

पुणे : वाहतूक नियमांची चिन्हं ७० पेक्षा जास्त आहेत, तर नियम आहेत किमान ५० आणि या सगळ्याची परीक्षा फक्त १० मिनिटांत होते. ते देखील १५ प्रश्नांमधून. त्यातील ९ बरोबर आले की लगेच शिकाऊ परवाना व त्यानंतर महिनाभराने वाहन चालवण्याची एक चाचणी दिली की पक्का परवाना मिळतो.  परंतु उमेदवाराला पडताळून पाहण्याची ठोस अशी व्यवस्था नाही. तसेच आता वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रबोधन करणारे सगळे उपक्रम ठप्प झाले आहेत. त्यामुळे वाहन चालवणाऱ्याला वाहतुकीचे नियम माहिती असतील याची शक्यता शून्य अशीच आहे. परिणामी अपघात होताना दिसून येत आहेत.

असा मिळतो परवाना

पूर्वी निदान प्रादेशिक परिवहन कार्यालयात परीक्षा होत असे. आता तर ऑनलाईन परीक्षा घेतात. रस्त्यांमध्ये फलकांवर असणारी चिन्हं व कायद्यासंबंधीचे फक्त १५ प्रश्न असतात. उत्तरांचे पर्याय दिलेले असतात. त्यातील ९ उत्तरे बरोबर आली तर लगेच शिकाऊ परवाना मिळतो. परीक्षेचे, त्यात पास करण्याचे काम एजंटद्वारे अगदी सहजपणे केले जाते. त्यामुळे उत्तीर्ण होण्याची काळजीच नसते.

शिकाऊ परवान्यानंतर..

एक महिन्यांनंतर व ६ महिन्यांच्या आत पक्का परवाना काढावा लागतो. त्यासाठी वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते. त्यात मैदानावर रंगवलेल्या इंग्रजी ८ च्या मोठ्या आकड्यात गाडी फिरवावी लागते. या एका चाचणीने वाहन चालवणाऱ्याला रस्त्यावरचे वाहतुकीचे सगळे नियम समजले असा प्रादेशिक परिवहन विभागाचा समज आहे.

दुचाकी व चारचाकीची पद्धत सारखीच

दोन्ही वाहनांसाठी परवाना मिळविण्याची पद्धत सारखीच आहे, त्यामुळेच वाहतुकीच्या नियमांचे अज्ञानही तसेच आहे. सिग्नल तोडू नये हा नियम बहुतेक वाहनचालकांना माहीत असतो व तोही पाळला जात नाही. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडू देणे, त्यासाठी पिवळा दिवा लागला तरी वाहन पुढे न काढणे, झेब्रा क्रॉसिंगच्या मागेच वाहन थांबविणे, दवाखाना असेल तिथे हॉर्न न वाजविणे, गर्दीच्या रस्त्यावर ओव्हरटेक न करणे, या नियमांची असंख्य वाहनचालकांना माहितीदेखील नाही.

प्रबोधनाचा अभाव

परवाना देतानाच निष्काळजीपणे दिला जातो. काही वर्षांपूर्वी वाहतूक शाखेच्या वतीने शाळा, महाविद्यालयांमध्ये आठवड्यातून एकदा एक तासाचा वाहतुकीच्या नियमांची माहिती देणारा अभ्यासक्रम होता. हा उपक्रम बंदच आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षणयाच अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून मुलांना चौकांमध्ये, रस्त्यांवर वाहतूक पोलिसांसमवेत उभे केले जात असे. काही वर्षांपूर्वी महापालिकेने वाहतूक शाखेला मदतनीस म्हणून काही कर्मचारी दिले होते. त्यांच्याकडूनही नागरिकांना सांगितले जात असे. तेही आता पूर्ण थांबले आहे.

स्वयंसेवी संस्थाही कंटाळल्या

रस्ता ओलांडताना वृद्ध व्यक्ती, दिव्यांग, महिला यांना त्रास होतो म्हणून काही स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चौकांमध्ये थांबून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना गुलाबाचे फूल देत गांधीगिरी सुरू केली होती. पण त्याचा परिणामच होत नसल्याने हे कार्यकर्तेही कंटाळले व हा उपक्रमही थांबला.

महापालिकेचे ट्रॅफिक पार्क

मुले, नागरिक यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी, यासाठी महापालिका येरवडा येथे ट्रॅफिक पार्क करणार होते. मात्र गेली अनेक वर्षे हा प्रस्ताव केवळ कागदावरच आहे. पुण्याच्या मागून येऊन अनेक शहरांमध्ये असे पार्क अस्तित्वात आले आहेत.

''कोरोना निर्बंधांमुळे शाळा, कॉलेजमधील उपक्रमावर मर्यादा आल्या होत्या. आम्ही आता पुन्हा हा अभ्यासक्रम सुरू करीत आहोत. प्रबोधन करणे गरजेचेच आहे, तरीही वाहतुकीच्या नियमांबाबत नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणेच अपेक्षित आहे असे वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.''  

''ट्रॅफिक पार्कचा प्रस्ताव आहे. मात्र त्याची प्रशासकीय प्रक्रिया अद्याप बाकी आहे. वाहन परवाना काढताना नागरिकांना येणाऱ्या सर्व अडचणींचे प्रात्यक्षिकाद्वारे निराकरण तसेच वाहतुकीच्या सर्व नियमांबाबत प्रबोधन, असे या पार्कचे स्वरूप आहे असे महापालिका उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.''  

Web Title: ignore traffic rules drive car Just take a 10 minute exam and get a speeding license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.