सनदी अधिकारी दुर्लक्षित : कौतिकराव ठाले-पाटील; लक्ष्मीकांत देशमुख यांच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:58 PM2018-01-16T12:58:12+5:302018-01-16T13:03:15+5:30
बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या संकेतस्थळाचे लोकार्पण सोमवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात करण्यात आले.
पुणे : राजकीय नेत्यांमधून येणारे लेखक, सनदी अधिकारी यांना कायम साहित्यवर्तुळातून दुर्लक्षित केले जाते. नेहमीच्या प्रवाहाबाहेरील लेखकांची साहित्य संस्था दखल घेत नाहीत. इतर भाषांमध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या साहित्याची उत्तम दखल घेण्यात आली आहे. त्या तुलनेत मराठी भाषेने या लेखकांना कायम दुय्यम लेखले आहे, अशी खंत मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी व्यक्त केली.
बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या संकेतस्थळाचे लोकार्पण सोमवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात करण्यात आले. या वेळी ठाले-पाटील बोलत होते. याप्रसंगी साहित्यिक संजय भास्कर जोशी उपस्थित होते.
ठाले-पाटील म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण हे उत्तम साहित्यिक, लेखक, विचारवंत होते. त्यांच्या ‘कृष्णाकाठ’, ‘सह्याद्रीचे वारे’ या पुस्तकांबाबत आजही चर्चा होते. मात्र, त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करावे, असे साहित्य संस्थांना वाटले नाही. तीच गोष्ट शरद पवार यांच्याबाबतीत लागू होते.
राजकीय नेते, सनदी अधिकाऱ्यांचा जीवनानुभव त्यांच्या लेखनातून प्रतिबिंबित होत असते. संबंधित क्षेत्रातील अनुभवांबाबत ते लिहीत असतात. त्याची दखल साहित्यवर्तुळाने घ्यायला हवी. कालखंड बदलले तरी साहित्याचे महत्त्व कमी होत नाही. महाराष्ट्रात साहित्य संस्था समाजाकडून चालवल्या जातात, ही कौतुकाची बाब आहे.’
वाचनसंस्कृती लयास नाही
जोशी म्हणाले, ‘संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक यंदा वादग्रस्त न ठरल्याने देशमुख यांनी नेहमीचा वादावादीचा संकेत मोडीत काढला. नव्या तंत्रज्ञानाशी, जगाशी जोडलेले संमेलनाध्यक्ष यंदा लाभले आहेत, हे विशेष. वाचनसंस्कृती लयाला चाललेली नाही, याची खात्री आपणच लोकांना करून दिली पाहिजे.’
ई-मराठी आणि साहित्यावर परिसंवाद
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘ई-मराठी आणि साहित्य’ या विषयावर एका विशेष परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर, एमकेसीएलचे उदय पांचपोर, सचिन ईटकर, महेंद्र मुंजाळ, संगणक सल्लागार कुलभूषण बिरनाळे व संतोष देशपांडे सहभागी झाले होते.
संमेलनाध्यक्षपद भूषवत असतानाच मला कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून काम करायचे आहे. विविध उपक्रमांमधून मराठी जगताशी जोडून राहण्याचा माझा कायम प्रयत्न असेल. शालेय ग्रंथालय, अनुवाद केंद्र यादृष्टीने काम करण्याचा माझा मानस आहे.
- लक्ष्मीकांत देशमुख