आयआयटी प्रवेशाचा कटऑफ कमी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 03:45 AM2019-05-28T03:45:01+5:302019-05-28T03:45:13+5:30
देशातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या संस्थेमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘जेईई अॅडव्हान्स्ड’ परीक्षा सोमवारी झाली.
पुणे : देशातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या संस्थेमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘जेईई अॅडव्हान्स्ड’ परीक्षा सोमवारी झाली. देशभरातून सुमारे १ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दरम्यान, भौतिकशास्त्र पेपर १ आणि गणित पेपर २ मधील प्रश्न अवघड गेल्याने यंदा कटआॅफ कमी होण्याची शक्यता आहे.
आयआयटी रुरकीमार्फत देशातील सुमारे १५५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. जेईई (मेन्स) परीक्षेतून सुमारे २ लाख ४५ हजार विद्यार्थी ‘जेईई अॅडव्हान्स्ड’साठी पात्र ठरले होते. पण त्यापैकी केवळ १ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली होती. ही परीक्षा सोमवारी सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २ ते ५ या दोन सत्रांत झाली. परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर केला जाणार आहे.
गणित व भौतिकशास्त्राचा पेपर अवघड गेल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. त्या तुलनेत रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका सोपी होती. मागील वर्षीच्या तुलनेत दोन विषयांची परीक्षा अवघड गेल्याने कटआॅफ कमी होण्याची शक्यता असल्याचे प्रवेश परीक्षा मार्गदर्शक दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले. यंदा प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. एकूण गुणांपैकी १२५ गुण मिळाले तरी आयआयटीमध्ये खुल्या गटात प्रवेश मिळू शकतो, असे प्रवेश परीक्षा मार्गदर्शक ललित कुमार यांनी सांगितले.