सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुकीचा आराखडा आयआयटी पवई करणार तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 01:55 PM2020-09-15T13:55:42+5:302020-09-15T14:04:21+5:30
पुढच्या ५० वर्षातील वाहतुकीचा अभ्यास करून आराखडा तयार करणार
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पुढील ५० वर्षातील वाहतुकीचा अभ्यास करून आराखडा तयार करण्याचे काम आयआयटी पवई करणार आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो तयार करण्याचे काम घेतलेल्या ठेकेदार कंपनीने त्यांना हा अभ्यास करण्यास सांगितले आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे कार्यकारी अभियंता भारतकुमार बाविसकर यांनी ही माहिती दिली. पीएमआरडीए या मेट्रोचे समन्वयक आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पूल या मेट्रोला अडथळा ठरत होता. तो नुकताच पाडण्यात आला. त्यानंतर आता मेट्रोच्या खांबांच्या मध्यभागातून नवा पूल बांधण्यात येणार आहे. मात्र त्यापुर्वी या रस्त्यावरील वाहतूकीचा अभ्यास करण्यात येणार आहे. आयआयटी पवई चे तज्ज्ञ अभियंते हा अभ्यास करतील.
पाडण्यात आलेल्या पुलाच्या बांधकाम रचनेबद्दल स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. तो पाडण्यात आल्यावर स्वयंसेवी संस्थांनीही प्रशासनावर बरीच टीका केली. आता काही पर्यावरणप्रेमी नागरिक तसेच जनंसघर्ष समितीने नवा पूल बांधतांना स्थानिक नागरिकांचे म्हणणे विचारात घेतले जावे, या मुख्य रस्त्याला असणारे पर्यायी रस्ते, त्यावरील वाहतूक, वाहनांची संख्या अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच नव्या पुलाची रचना करावी अशी मागणी या समितीने जाहीरपणे केली आहे.
त्यामुळेच हे काम आयआयटीला दिले आहे. ते सध्याची वाहतूक, वाहनसंख्या, वाहनांचे प्रकार, गर्दीच्या वेळा याचा सगळ्याचा अभ्यास तर करतीलच शिवाय आराखडा तयार करताना पुढील ५० वर्षाच्या वाहतूकीचा अंदाज काढून त्याप्रमाणेच नियोजन करतील असे ठेकेदार कंपनीकडून सांगण्यात आले. नव्या दुहेरी पुलाची रचना करताना सर्व आवश्यक गोष्टींचा विचार केला जाईल अशी माहिती देण्यात आली.