बाईक टॅक्सीचा बेकायदा व्यावसायिक वापर; ॲप चालवणाऱ्या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 10:42 AM2022-12-27T10:42:55+5:302022-12-27T10:43:03+5:30
शासनाला कोणताही कर न भरता शासनाची फसवणूक केली जात असल्याचे तक्रारीत नमूद
पुणे: मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी रॅपिडो बाईक टॅक्सी ॲप चालवणाऱ्या रॅपिडो कंपनीसह, कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्ट अंतर्गत बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत रामराजे भोसले यांनी २४ नोव्हेंबर रोजी रॅपिडो बाईक टॅक्सी हे ॲप बेकायदा पद्धतीने सुरू असल्याची तक्रार दिली होती. तसेच हे ॲप कायदेशीर असल्याचे दुचाकी वाहनचालकांना व प्रवाशांना भासवून बेकायदा प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे म्हटले होते. याचा मोबदला रॅपिडो कंपनीला मिळत असल्याने कंपनीचे अधिकारी जगदीश पाटील व अन्य एका अधिकाऱ्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
२३ डिसेंबर रोजी अनंत भोसले यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात राज्य शासनाने तसेच प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बाईक बाईक टॅक्सीचा संवर्गात समुच्चय परवाना नाकारला असल्याने रॅपिडो बाईक टॅक्सी हे ऑनलाईन ॲप बेकादा असल्याची कल्पना कंपनीच्या अधिकाऱ्यांना असतानाही तसेच समाजात अशांतता निर्माण होईल, अशी वक्तव्ये कंपनीचे अधिकारी समाजमाध्यमांवर करत असल्याचे म्हटले आहे.
शासनाची फसवणूक केल्याचा आरोप
खासगी दुचाकी चालकांकडून बेकायदा व्यावसायिक वापर केला जात असून, शासनाला कोणताही कर न भरता शासनाची फसवणूक केली जात असल्याचे देखील म्हटले आहे. यामध्ये रॅपिडो कंपनीचे अधिकारी अरविंद सांका आणि शांतनु शर्मा यांचाही सहभाग असल्याचे भोसले यांनी दिलेल्या पुरवणी जबाबत नमूद केले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात सांका आणि शर्मा यांचा देखील आरोपी म्हणून समावेश करण्यात आला असून, पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.