बेकायदा बांधकामांचे जंजाळ
By admin | Published: August 1, 2014 05:17 AM2014-08-01T05:17:08+5:302014-08-01T05:17:08+5:30
शहराच्या चारही बाजूला डोंगर व टेकड्या आहेत. या डोंगरउतारावर धोकादायकरीत्या बेकायदेशीर झोपडपट्टी व वसाहती उभारण्यात आल्या आहेत
पुणे : शहराच्या चारही बाजूला डोंगर व टेकड्या आहेत. या डोंगरउतारावर धोकादायकरीत्या बेकायदेशीर झोपडपट्टी व वसाहती उभारण्यात आल्या आहेत. बिबवेवाडीत बुधवारी व येरवड्यात गुरुवारी दरड कोसळली. त्याचा सर्वाधिक धोका कात्रज परिसरातील डोंगरउतारावरील वसाहतींना आहे.
एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग येते. आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर डोंगर कोसळला. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बांधकाम विभागाचे प्रमुख व नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना डोंगर व टेकड्यांच्या उतारावरील धोकादायक स्थितीतील वसाहती, झोपड्या व घरांचे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथकाद्वारे थेट वसाहतीमध्ये जाऊन नागरिकांना दक्षतेचा इशारा देताना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले जात आहे.
शहराचे दक्षिण टोक असलेल्या कात्रज परिसरातील डोंगराच्या उताराला आगम मंदिर परिसरात अनेक घरे आहेत. त्यानंतर दरी पूल भागातही मोठ्या प्रमाणात डोंगरउतारावर बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत. तर कात्रजच्या डोंगराच्या रांगेतील अनेक टेकड्या फोडून सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात धोका वाढत चालला आहे. परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. बिबवेवाडी येथील यश लॉनकडे जाण्यासाठी टेकडी फोडून मेघस्पर्श सोसायटीसमोरचा रस्ता करण्यात आला आहे. त्या ठिकाणी बुधवारी दरड कोसळली. जिवीतहानी झाली नाही. त्यानंतर रामनगरमध्ये गुरुवारी दरड कोसळली आहे. त्या पार्श्वभूमीवर डोंगर व टेकड्यांच्या उतारावरील वसाहतीच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)