बेकायदा खोदकाम थांबविले
By Admin | Published: April 29, 2016 01:27 AM2016-04-29T01:27:09+5:302016-04-29T01:27:09+5:30
निक नगरसेवक दिनेश धावडे यांनी या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून त्यांच्याच प्रभागात पालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवत सुरू असलेले खोदकाम थांबवले.
बिबवेवाडी : प्रभाग क्रमांक ७२ अप्परचे स्थानिक नगरसेवक दिनेश धावडे यांनी या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून त्यांच्याच प्रभागात पालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवत सुरू असलेले खोदकाम थांबवले.
प्रभाग क्रमांक ७२ मध्ये एका खासगी कंपनीचे केबल टाकण्याचे काम बुधवारी (दि. २७) सुरू करण्यात आले होते. अप्पर रोड ते महेश सोसायटी या रस्त्यावर ६०० मी. रस्ता खोदून केबल टाकण्याच्या कामाला पालिकेने काही अटी देऊन परवानगी दिली होती. मात्र, पालिकेच्या या अटींना केराची टोपली दाखवत या कंपनीचे काम सुरू होते. या कामाची पाहणी करणे, ज्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे ते अधिकारी या कामावर फिरकलेदेखील नाहीत. स्थानिक नागरिकांनी नगरसेवक दिनेश धावडे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर धावडे यांनी कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता वर्कआॅर्डरवर असलेले अनेक नियम पायदळी तुडवत हे काम सुरू असल्याचे धावडे यांच्या लक्षात आले. धावडे यांनी या ठिकाणी स्थानिक पत्रकार तसेच पालिका अधिकाऱ्यांना बोलावले; परंतु एकही पालिका अधिकारी संपर्क करूनही पाहणीसाठी आले नाहीत.
दिनेश धावडे यांनी पालिकेत जाऊन मुख्य अभियंता पथ विभाग यांची भेट घेतली. त्यानंतर पत्र देऊन हे काम जैसे थे ठेवण्याचे आदेश पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत. या पत्रात स्पष्टपणे सांगितले आहे, की वर्कआॅर्डरमधील सांगितलेल्या अटीनुसार पथ विभागाकडील अभियंत्याशी संपर्क साधून त्यांच्या सूचनेनुसार काम करणे आवश्यक असताना त्याप्रमाणे काम केले नाही. काम सुरु करण्यापूर्वी संबंधित मनपाच्या अभियंत्याकडून खोदाईची आउटलाइन मान्य करून घेणे आवश्यक असताना त्याप्रमाणे कार्यवाही केलेली नाही. तसेच जागेवर विहित नमुन्यातील (परवानगीचा दिनांक नमूद करून व आवश्यक सूचना नमूद करून) बोर्ड लावणे आवश्यक असताना त्याप्रमाणे बोर्ड लावलेला नाही. (वार्ताहर)
>नियम पाळायला हवेत
४एका वेळी १०० मी.पर्यंत खोदाई हाती घेणे आवश्यक असताना जागेवर एकाच वेळी सुमारे २०० मीटरहून अधिक खोदाईचे काम चालू केले आहे. पालिकेचे नियम पाळून संबंधित कंपनीने व त्यांच्या ठेकेदारांनी कामे केली असती तर आज संपूर्ण पुणेकरांना या रस्ते खोदाईच्या त्रासातून मुक्ती मिळाली असती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.