केबलसाठी रस्त्यावर बेकायदा खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:37 AM2018-10-04T00:37:48+5:302018-10-04T00:38:26+5:30
अपघाताची शक्यता : गुन्हा दाखल करा
लासुर्णे : इंदापूर तालुक्यात खासगी मोबाईल कंपनीच्या केबलसाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू आहे. रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटरवर खोदकाम करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा नियम असतानादेखील नियम पायदळी तुडवत अनधिकृत खोदकाम करत असल्याने प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या खासगी मोबाइल कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
इंदापूर तालुक्यात खासगी मोबाईल कंपनीने रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू आहे. शासनाचा नियम आहे की जिथे खोदकाम करायचे आहे, त्या रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर अंतरावर खोदकाम करावे. परंतु तालुक्यात जी खोदकामे सुरू आहेत, ती साईडपट्टीवरच सुरू असल्याने प्रवाशांच्या जीवितास धोका होऊ शकतो. मोबाइल खासगी कंपन्या सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली असल्याचे सांगत राजरोसपणे खोदकाम करत आहेत. यामुळे रस्त्याच्या साईडपट्ट्यांची चाळण होत असून, साईडपट्ट्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात होऊ शकतो. यासाठी या खासगी मोबाईल कंपन्यांच्या अधिकारी व मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे इंदापूर तालुकाप्रमुख संजय काळे यांनी केली आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बारभाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, फोटो असतील तर पाठवा, त्वरित कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. इंदापूरच्या पश्चिम भागात खासगी मोबाइल कंपनीने रस्त्याच्या साईडपट्टीवर अनधिकृत केलेले खोदकाम.
खोदकामासाठी घेतली सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी
या कामात रस्त्याच्या साईडपट्ट्यांची चाळण झाली असून, अपघाताचा धोका संभवतो