अवैध गुटखा सुरू आहे जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:02 PM2018-08-29T23:02:32+5:302018-08-29T23:02:49+5:30
फोफावतोय बेकायदा व्यवसाय : पोलीस तसेच अन्न व औषध विभागाची मेहेरनजर
नीरा : राज्य शासनाने गुटखाविक्रीवर बंदी घातली असली, तरी या बंदीच्या आदेशाची पायमल्ली करून तालुक्यातील दक्षिण-पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची सर्रास विक्री होताना दिसत आहे. जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते तसेच महामार्गाच्या कडेला असलेल्या पानाच्या दुकानांमधून (टपऱ्या) तसेच किराणा दुकानातून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा गुटखा तसेच ओला मावा विकला जात आहे. ग्रामीण पोलीस तसेच अन्न व औषध विभागाची मेहेरनजर या व्यावसायिकांवर असल्याने बेकायदा विक्री फोफावत चालली आहे.
गुटखाबंदीचा कायदा करून सरकारने गुटखाविक्री तसेच उत्पादन व वाहतूक यांवर निर्बंध लादले. कायदा न मोडता तो पद्धतशीरपणे वाकविण्याची वृत्ती असलेल्या महाभागांनी सुपारी व तंबाखू आशा दोन पुड्या तयार करून यापासून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. सरकारने तोही हाणून पाडत अशा प्रकारच्या उत्पादनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, हे आदेश झुगारून लावत अर्थपूर्ण संबंध व्यावसायिकांनी तयार करीत अशा उत्पादनांची विक्री सुरूच ठेवली आहे.
शाळा तसेच महाविद्यालय परिसराच्या १०० मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास तसेच सेवन करण्यास बंदी असतानाही शाळा व विद्यालयाजवळच्या अनेक दुकानांतून गुटखाविक्री सुरू आहे. शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुणांमध्ये या व्यसनाचे प्रमाण वाढत असून डोळेझाक करणारी सरकारी यंत्रणा याला कारणीभूत असल्याचे मत अनेक पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
पानपट्टी किंवा दुकान वजा घराचा आसरा घेऊन मोठ्या गावांमध्ये गुटखाविक्री होत आहे. सध्या तर हॉटेल, किराणा दुकानांतही खुलेआम गुटखाविक्रीने स्वरूप धारण केले आहे. दूधविक्रेतेदेखील गुटखाविक्री करतानाचे चित्र दिसून येत आहे. लहान मुले व तरुण याकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येते. काही पानटपरीधारक तंबाखू, सुगंधी सुपारी व इतर घातक रसायनांचे मिश्रण करून ओला मावा प्लॅस्टिकच्या पिशव्या भरून विकत आहेत.
गावठी दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्त
यवत : सहजपूर (ता. दौंड) गावाच्या हद्दीत यवत पोलिसांनी संशयित टेम्पो पकडून त्यातील हातभट्टीची गावठी दारू जप्त केली आहे.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांना मिळालेल्या खबरीनुसार त्यांनी पोलीस पथक बुधवारी सकाळी रवाना केले होते. पोलीस नाईक दीपक पालखे, पोलीस हवालदार वाघ व पोलीस शिपाई उत्तप्पा संकुल यांना त्यांनी संबंधित ठिकाणी छापा मारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित पोलीस पथकाने सहजपुर येथे संशयित रित्या वाहतूक करणारा टेम्पो (एमएच ४२, एम ८०८६) तपासला. यावेळी टेम्पो मध्ये २४५ लिटर तयार गावठी दारू अंदाजे किंमत २४ हजार ५०० रुपये मिळून आले. पोलिसांनी टेम्पो सह गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी जया अमित गुडदावत (रा. गाडामोडी, खामगाव, ता. दौंड), टेंम्पोचालक दत्ता गणपत पंडित (रा. गाडामोडी, ता. दौंड) व माल विकत घेणार सोमा लोंढे (रा. हडपसर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी उत्तप्पा यल्लाप्पा संकुल यांनी फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक दिपक पालखे हे करीत आहेत.