खेडच्या पूर्व भागात अवैध दारू विक्री जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:50+5:302021-07-03T04:07:50+5:30
दावडी : खेड तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावात कोरोनाच्या काळातही अवैध दारु विक्री जोमात सुरु आहे. कारवाई झाली तरी ...
दावडी : खेड तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावात कोरोनाच्या काळातही अवैध दारु विक्री जोमात सुरु आहे. कारवाई झाली तरी पुन्हा हा धंदा सुरू होतो. दारू विक्रेत्यांकडून 'मलिदा' मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अवैध दारू धंदे बंद करावेत, अशी मागणी राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष व निमगावचे पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण भागात कोरोना पाय पसरवत असताना दारु विक्रीला जोर आल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी, निमगाव, कनेरसर, वाफगाव या ठिकाणी अवैध दारु विक्री खुलेआम सुरु आहे. खेड ते दावडी , खेड ते वाफगाव, तसेच खेड ते कनेरसर या रस्त्यालगत ठिकठिकाणी ढाब्यावर अवैधरित्या दारू मिळत आहे. अवैध दारू विक्रेत्यांचे ढाबे रस्त्यालगत असल्याने या ठिकाणी तळीरामांची नेहमी गर्दी असते. तळीराम रस्त्यावरच गाडी पार्क करून जात असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये अवैध दारु विक्री जोमात सुरु आहे. एकीकडे या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह या भागातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. तसेच सर्वत्र सोशल डिस्टन्सचे पालन करण्याची खबरदारी घेण्यात येत आहे. परंतु, दुसरीकडे या भागात अवैध दारु विक्रीला जोर आला असून दारुच्या अड्डयावर अनेक तळीराम मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात. अवैध दारुचे अड्डे मात्र खुलेआम सुरु आहेत. दारू विक्री करणार्यांची दहशत असल्यामुळे तसेच बीट अंमलदाराशी आर्थिक जवळीक असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नाही. यामुळे दारू विक्रीचा हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे रेटवडीचे पोलीस पाटील उत्तम खंडागळे, खरपुडीचे पोलीस पाटील दादाभाऊ निकाळजे यांनी सांगितले.
अवैधरित्या दारू मिळत असल्याने तसेच शाळा व महाविद्यालय बंद असल्याने महाविद्यालयीन युवकांना दारुचे व्यसन लागण्याची शक्यता आहे.
दावडी परिसरात खुलेआमे अवैध दारूची विक्री जोमात सुरू आहे. याबाबत खेड पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना याबाबत वारवांर माहिती देऊनही
कित्येक दिवसापासून सुरु असलेल्या अवैध दारु विक्रीविरोधात पोलिसांकडून कार्यवाही होत नसल्याने दारु विक्रेत्यांची संख्या वाढली आहे.
-आत्माराम डुंबरे ,पोलीस पाटील, दावडी