पोलिसांच्या 'या' कृतीने बारामतीत अवैध सावकारांचे धाबे दणाणले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 01:10 PM2020-11-07T13:10:09+5:302020-11-07T13:11:32+5:30
शहरातील एका बड्या व्यापाऱ्याने सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे
बारामती : बारामती शहरातील एका बड्या व्यापाऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांच्या कुटुंबियांनी देखील याबाबत संशय व्यक्त केला आहे. जुलमी पध्दतीने वसुली करत निर्ढावलेल्या अवैध गब्बर सावकारांविरुध्द पोलिसांनी प्रथमच आक्रमक पवित्रा उचलला आहे. त्यामुळे या सावकारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची बदली झाली आहे.त्याच्या जागेवर पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. याच दरम्यान,शहरातील एका बड्या व्यापाऱ्याने सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांच्या कुटुंबियांनी देखील याबाबत संशय व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक शिंदे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सावकारांच्या दबावातुन बड्या व्यापाऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते,तिथे सर्व सामान्यांचे काय ,असा प्रश्न पोलीस प्रशासनाला पडला आहे.या पार्श्वभूमीवर अस्वस्थ झालेल्या पोलिसांनी सावकाराच्या अन्यायाला बळी पडलेल्या नागरिकांचा शोध सुरु केला आहे.त्यासाठी पोलिसांनी रिक्षा लावुन सावकारांविरोधात चक्क दवंडी देण्यास सुरवात केली आहे.
सावकारी करण्याचा परवाना नसलेल्या ,अवैध रितीने पैसे देणाऱ्यांनी त्यांचा धंदा थांबवावा.त्यांची एक रुपया देखील वसूली होऊ शकणार नाही.त्यांनी त्यांची वसुली थांबवावी.अन्यथा गाठ खाकी वर्दीशी आहे,असा सज्जड दम पोलीस निरीक्षक शिंदे यांनी भरला आहे.अवैध सावकारांचा त्रास होत असेल तर थेट पोलिसांना माहिती द्यावी.स्वत: पोलिस अधीक्षकांनीही याची नोंद घेतली असल्याने बारामतीत सावकारी हद्दपार होण्याची चिन्हे आहेत.