चाकण शहरात बेकायदा पार्किंगमुळे सतत होतेय वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:47+5:302021-06-17T04:08:47+5:30
चाकण शहरातील जुन्या पुणे-नाशिक रस्त्याच्या मार्केट यार्ड ते चाकण कमानी दरम्यान मोठी बाजारपेठ आहे. रस्त्याच्या दुतर्फा हातगाडी,पथारी,भाजीपाला या छोट्या ...
चाकण शहरातील जुन्या पुणे-नाशिक रस्त्याच्या मार्केट यार्ड ते चाकण कमानी दरम्यान मोठी बाजारपेठ आहे. रस्त्याच्या दुतर्फा हातगाडी,पथारी,भाजीपाला या छोट्या विक्रेत्यांसह विविध प्रकारच्या मोठी दुकाने, बँका आहेत. शहरात अधिकृत दुचाकी,चारचाकी वाहनतळ नसल्याने खरेदीसाठी किंवा काही कामानिमित्त आलेल्या लोकांच्या दुचाकी किंवा चारचाकी वाहने जिथे जागा मिळेल तिथे कशीही आडवीतिडवी उभी केली जात आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाहने बेशिस्तपणे उभी केली जात असल्याने सतत वाहतूककोंडी होते.यामुळे पादचारी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
--
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष -
शहरातील आंबेठाण चौक, महात्मा फुले चौक, एसटी बस स्थानक, माणिक चौक तसेच तळेगाव चौकामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने मनमानीपणे उभी केली जात आहेत. पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव चौक ते आंबेठाण चौक दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा तीनचाकी व चारचाकी वाहने पार्किंग केली जात आहेत. याकडे वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
--
सम-विषम पार्किंग दिसेना -
चाकण शहरातील माणिक चौक ते मार्केट यार्ड दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे.या दरम्यानच्या रस्त्यावर सम-विषम पार्किंग केली जाणार असल्याचे नगर परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले होते.परंतु याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
--------------------------------------------------------
फोटो क्रमांक : १६चाकण शहरात बेकायदेशीर पार्किंग
फोटो - चाकण शहरातील बेकायदा पार्किंग केलेली वाहने.