रस्त्यावर बेकायदा ‘वाहनतळ’
By admin | Published: January 25, 2017 02:18 AM2017-01-25T02:18:52+5:302017-01-25T02:18:52+5:30
औंध व बाणेर यांना जोडणारा मेडिपॉइंट हॉस्पिटल रोडवर अनेक जड वाहने, खासगी कंपन्यांच्या बस, खासगी टॅक्सी उभ्या केल्या
औंध : औंध व बाणेर यांना जोडणारा मेडिपॉइंट हॉस्पिटल रोडवर अनेक जड वाहने, खासगी कंपन्यांच्या बस, खासगी टॅक्सी उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीकरिता हा रस्ता डोकेदुखीचा ठरत असून, महापालिका प्रशासनाने त्यात गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.
बाणेर व औंधमधील नागरिकांना ये-जा करण्यास अत्यंत सोयीचे व्हावे व अवघ्या काही मिनिटांत नागरिकांना बाणेरमधून औंध येथे पोहोचता यावे व बाणेर रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी या रस्त्याची निर्मिती करण्यात आली.
वाहतुकीचा प्रश्न सोडविला असल्याचे बोलले जात असताना प्रत्यक्षात या रस्त्याने प्रश्नांचे स्वरूप बदलले असून, हा रस्ता अनधिकृत वाहनतळच बनला असल्याचे दिसून येते. त्यातच या रस्त्यावरील पदपथाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने पादचाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मेडिपॉइंट रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर खासगी कंपन्यांची वाहने तळ ठोकून उभी असतात. या संपूर्ण रस्त्यावर रात्रीच्या वेळी रोडरोमिओ, मद्यपींचा वावर दिसून येत आहे.
अनेकदा या रस्त्यावरून जाताना अंदाज न आल्याने छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. महापालिका प्रशासनाने सजग होऊन या ठिकाणी कारवाई केल्यास विद्यार्थी, नागरिक व वाहनचालकांची गैरसोय टळेल, असे येथील नागरिकांचे मत आहे.