वनविभागाची भिंत तोडून आत येऊन अवैध पार्ट्यांना ऊत आलाय; टेकड्यांच्या संरक्षणासाठी सरसावल्या खासदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:58 IST2025-01-07T10:58:41+5:302025-01-07T10:58:53+5:30
टेकडीवर अतिक्रमणे होऊ नये किंवा विकासाच्या नावाखाली टेकडीला धक्का बसू नये यासाठी मेधा कुलकर्णी नेहमीच दक्ष असतात

वनविभागाची भिंत तोडून आत येऊन अवैध पार्ट्यांना ऊत आलाय; टेकड्यांच्या संरक्षणासाठी सरसावल्या खासदार
पुणे: शहरातील टेकड्यांची फोड होऊ नये, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील पुढाकार घेतला आहे. त्या पूर्वीपासूनच टेकड्या वाचविण्यासाठी सक्रिय आहेत. टेकडी फोड करून बांधकामे होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांनी स्वत: वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वारजे - कर्वेनगर क्षेत्रीय पुणे कार्यालयाचे विजय नाईकल, वनविभागाचे वनसंरक्षक दीपक पवार, मनोज बारबोले त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिका वारजे कर्वेनगर पाणीपुरवठा विभागाचे संतोष लांजेकर, अतिक्रमण विभागाचे श्रीकृष्ण सोनार, संदिपान भागडे, कोथरूड वॉर्ड ऑफिसचे उपअभियंता संतोष गायकवाड उपस्थित होते.
कोथरूड येथील गोपीनाथ नगर, महात्मा सोसायटी, वनदेवी टेकडी या परिसरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. डुक्कर पाळणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने येथील पर्यावरण धोक्यात आले आहे. मोरांचे वास्तव्य असलेल्या या भागातील मोरांची व इतर पक्ष्यांची संख्या रोडावून कावळे व कबुतरांचे साम्राज्य पसरले आहे. राडारोडा टाकणाऱ्या गाड्या अवैधरित्या टेकडीवर येऊन राडारोडा टाकत आहेत. अनधिकृत बांधकामांना सर्रास पाणी व वीज जोडणी मिळत आहे. वनविभागाची भिंत तोडून आत येऊन अवैध पार्ट्यांना ऊत आला आहे. या सर्वांवर योग्य ते उपाय करावेत, अशा सूचना मेधा कुलकर्णी यांनी दिल्या.
मेधा कुलकर्णी या नेहमीच पुण्यातील टेकड्या या सुरक्षित राहायला हव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. टेकडीवर अतिक्रमणे होऊ नये किंवा विकासाच्या नावाखाली टेकडीला धक्का बसू नये यासाठी देखील त्या दक्ष असतात. त्यामुळेच त्यांनी वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.