अवैध दारू विक्री, जुगार अड्ड्यावर छापा टाकून ५४ हजार ५०६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 05:22 PM2021-03-14T17:22:24+5:302021-03-14T17:23:08+5:30
पिंपरी चिंचवड पोलिसांकडून कारवाई दोन ठिकाणी कारवाई अकरा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल
अवैध दारू विक्री तसेच कल्याण मटका जुगार अड्डा अशा दोन ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी तब्बल ५४ हजार ५०६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ११ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.
पहिल्या कारवाईत अंकुश चौक, ओटास्किम, निगडी येथे सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला काहीजण कल्याण मटका नावाचा जुगार खेळत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईमध्ये पोलिसांनी २४ हजार ४०० रुपयांची रोकड, ६८ रुपयांचे मटका साहित्य, २१ हजार २०० रुपयांचे सात मोबाईल फोन, असा एकूण ४५ हजार ६६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शत्रुघन मेसा कठारे (वय ५०, रा. चिंचवड) आणि अन्य आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. आळंदी-चाकण रोडवर केळगाव आळंदी येथे असलेल्या हॉटेल राजमुद्रा व्हेज नॉनव्हेज ज्यूस बार या हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत ७८० रुपयांची रोकड आणि ८ हजार ५८ रुपयांची देशी-विदेशी दारू, असा एकूण आठ हजार ८३८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी रमन कैलास राणा (वय २३, रा. हनुमानवाडी, केळगाव, आळंदी) व इतर एका इसमावच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.