बेकायदा वाळू वाहतूक रोखणारच

By admin | Published: February 17, 2016 01:33 AM2016-02-17T01:33:20+5:302016-02-17T01:33:20+5:30

वाळू वाहतूकदारांनी केलेल्या आंदोलनामुळे बेकायदा वाळू वाहतुकीवर कारवाई थांबणार का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच यवत पोलिसांनी धडक कारवाई करीत तब्बल

Illegal sand traffic will stop | बेकायदा वाळू वाहतूक रोखणारच

बेकायदा वाळू वाहतूक रोखणारच

Next

यवत : वाळू वाहतूकदारांनी केलेल्या आंदोलनामुळे बेकायदा वाळू वाहतुकीवर कारवाई थांबणार का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच यवत पोलिसांनी धडक कारवाई करीत तब्बल ३६ ट्रक पकडले. महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार अंदाजे ७५ लाख रुपयांचा दंड केला जाणार आहे.
कसलाही शासकीय कर भरल्याच्या पावत्या नसताना बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करून परत कारवाई झाल्यास दबावतंत्राचा वापर करणे चुकीचे असून कारवाई सुरूच राहणार असल्याचे अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यवत पोलीस, दौंड महसूल विभाग व पुणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी संयुक्त ही कारवाई करण्यात आली. रविवारी (दि. १४) यवत पोलीस स्टेशनमध्ये पुणे व सोलापूर वाळू वाहतूकदार संघर्ष समिती व पोलिसांमध्ये वाळू वाहतुकीच्या ट्रकवर कारवाई केल्याच्या कारणावरून वाद झाला होता. यावरून परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोप झाल्याने वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले होते.
यवतचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण कारवाईवर ठाम राहिले आणि बेकायदेशीर धंदे करून दहशत निर्माण करून दबाव टाकत असल्यास सहन केले जाणार नाही, अशी भूमिका घेतली. यावर वाळू वाहतूकदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलीस खात्यामधील पैशाच्या वाढत्या हव्यासापायी वाळू वाहतूकदार यांना वेठीस धरले जात असल्याचे सांगत परत आंदोलनाचा इशारा दिला होता.
दरम्यान, काल (दि. १५) बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर धडक कारवाई करीत चांगलाच दणका दिला. महसूल विभागाचे पुरंदर उपविभाग प्रांत समीर शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डॉ. सुनील शेळके, मंडल अधिकारी ज्ञानदेव यादव, गिरीश भालेराव, तलाठी रवींद्र होले, किशोर परदेशी, स्नेहा कांबळे, बजरंग सोनवणे, जगताप यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
रात्रभर कारवाई करीत ३६ बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे ट्रक ताब्यात घेतले. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्यानंतर पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी भेट देत पाहणी केली.
दरम्यान, सकाळपासून महसूल विभागाने संबंधित ट्रकमधील वाळूबाबत खातरजमा करून प्रतिब्रासला ५३ हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली.
बेकायदेशीर वाळू वाहतूक केली जात असलेल्या ३६ ट्रकमधून सुमारे १४४ ब्रास वाळूचे अंदाजे ७५ लाख रुपये दंड या कारवाईमधून वसूल केला जाणार असल्याचे या वेळी महसूल विभागाच्या वतीने मंडल अधिकारी ज्ञानदेव यादव यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Illegal sand traffic will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.