मार्केट यार्डातले नियमबाह्य सुरक्षेचे ठेके अखेर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:08 AM2021-06-23T04:08:27+5:302021-06-23T04:08:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने निविदा प्रक्रिया राबवली होती. यात खुद्द बाजार समितीतील तत्कालीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने निविदा प्रक्रिया राबवली होती. यात खुद्द बाजार समितीतील तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमताने आपल्या मर्जीतील दोन कंपन्यांना सुरक्षेचे ठेके दिले. पणन संचालक आणि पणन मंत्र्यांच्या फेरचौकशीत हे उघड झाल्याने वरील दोन्ही कंपन्यांचे ठेके रद्द करण्याचे आदेश पणन संचालकांनी काढले आहेत. तसेच, २४ मे २०२१ च्या सुधारित आदेशात निविदेतील पात्र ठेकेदाराला ठेका देण्याचे आदेश दिले आहे. हा सर्व प्रकार अडीच वर्षांनंतर उघडकीस आल्यानंतर बाजार समितीच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
फूल बाजार आणि भुसार बाजार येथे सुरक्षारक्षक ठेवण्यासाठी पुणे बाजार समितीने १५ ऑक्टोबर २०१८ ते १४ ऑक्टोबर २०२१ या दरम्यान कॉर्डन सिक्युरिटी गार्डस अँड लेबर सर्व्हिसेस आणि साईराम सिक्युरिटी सर्व्हिसेस एजन्सी या दोन कंपन्यांना बाजार समितीने ठेका दिला होता. मात्र, हे ठेके नियमबाह्यपणे दिले असून आम्ही नियमानुसार पात्र आहोत, असे सांगत सायन व्हिजिलंट सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी पणन संचालक यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे पणन संचालक यांनी चौकशी करून हे नियमबाह्य दिलेले ठेके तत्काळ रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच याच निविदेतील पात्र ठेकेदारास ठेका देण्याचा आदेश दिला.
मात्र, त्यावर साईराम आणि कॉर्डन या दोन कंपन्यांनी आक्षेप घेत पणन मंत्र्यांकडे अपील केले. मात्र, पणन मंत्र्यांच्या समोर झालेल्या सुनावणीत साईराम आणि कॉर्डन कंपनीला आपले म्हणणे सादर करण्याची संधी दिली. तसेच फेरचौकशीचे आदेश दिले. मात्र, फेरचौकशीत साईराम आणि कॉर्डन या दोन्ही कंपनीने आपले म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे त्यांना दिलेले नियमबाह्य ठेके रद्द करण्यात आले. तसेच याच निविदेतील पात्र सायन व्हिजिलंट सर्व्हिसेसला ठेका देण्याचा आदेश दिला. त्यामुळे १ जून २०२१ पासून सायन व्हिजिलंटने कामकाज सुरू केले आहे.
“बाजार समितीच्या निविदेतील नियमानुसार १५ ऑक्टोबर २०१८ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीसाठी आम्ही पात्र होतो. मात्र, आम्हाला डावलून नियमबाह्यपणे कॉर्डन आणि साईराम या कंपन्यांना ठेके दिले. ते आता पणन संचालकांनी रद्द केले. १ जूनपासून आम्हाला काम करण्यास सांगितले आहे. मात्र, आम्हाला फक्त १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंतच सेवा देता येणार आहे. त्यामुळे आम्ही पात्र असूनही केवळ चार महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. आमचे अडीच वर्षे आर्थिक नुकसान झाले असून १४ ऑक्टोबरपासून पुढे आम्हाला ठेका वाढवून मिळायला हवा”, अशी मागणी सायन व्हिजिलंट सर्व्हिसेसच्या संचालक सुप्रिया संकपाळ यांनी केली आहे.
कोट
“नियमाप्रमाणे आता सायन व्हिजिलंट कंपनीला १ जून ते १४ ऑक्टोबर २०२१ या पुढील चार महिन्यांसाठीच ठेका दिला आहे. त्यानंतर पुढे आम्ही मिलिटरीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना (मेस्का महामंडळ) सुरक्षारक्षक म्हणून नेमणार आहोत. सायन व्हिजिलंटला आम्ही मोशी उपबाजार आणि मांजरी उपबाजार येथील सुरक्षेचा ठेका देऊ.”
- मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती