कारमळा येथे सिलिंडरचा अवैध साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:12 AM2021-02-15T04:12:06+5:302021-02-15T04:12:06+5:30
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नवनाथ बन्सीलाल थोरात (रा. कारमळा, रांजणी, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नवनाथ बन्सीलाल थोरात (रा. कारमळा, रांजणी, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास रांजणी गावच्या हद्दीत कारमाळा येथील नवनाथ बन्सीलाल थोरात यांच्या बंद खोलीत गॅस सिलिंडर विक्री अथवा साठा याबाबत परवाना नसताना, बेकायदेशीरपणे व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरचा साठा केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना मिळाली. कोरे यांनी सहायक पोलीस निरीक्षक अर्पणा जाधव, पोलीस नाईक अजित मडके, पोलीस जवान आदिनाथ लोखंडे, पोलीस जवान एस. एन. शिंदे, योगेश रोडे यांच्या पथकाने पाहणी केली असता बंद खोलीमध्ये सिलेंडरचा साठा आढळला. २२ हजार ४०० रुपये किमतीच्या १३ इंडियन कंपनीच्या निळ्या रंगाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टाक्या व १५ हजार ९०० रुपयांच्या एचपी कंपनीच्या निळ्या रंगाच्या टाक्या, आठ सीलबंद व ११ रिकाम्या टाक्या आढळल्या. मंचर पोलिसांनी टाक्या जप्त करून नवनाथ बन्सीलाल थोरात (रा. कारमळा, रांजणी, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.