कोंढवा, विमानतळ, हडपसरमध्ये अवैध धंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:14 AM2021-08-29T04:14:29+5:302021-08-29T04:14:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात अवैधरीत्या दारू व अमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. गुन्हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात अवैधरीत्या दारू व अमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. गुन्हे शाखेने कोंढवा, विमानतळ, हडपसर या फक्त तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवसात तब्बल १२ ठिकाणी कारवाई केली आहे. दारूविक्री, हुक्का पार्लर व अमली पदार्थ विक्री करणाऱ्याबाबत ११ गुन्हे दाखल केले असून २ लाख ७ हजार ५७३ रुपयांचा माल जप्त केला आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा दारू विक्री होत असून अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार आयुक्तांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांना कारवाईचे आदेश दिले.
गुन्हे शाखेतील २ पोलीस निरीक्षक, २४ उपनिरीक्षक व पोलीस मुख्यालय, तसेच गुन्हे शाखेकडील ३२ अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली. त्यांनी एकाच वेळी विमानतळ, कोंढवा व हडपसर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. त्यात ११ गुन्हे दाखल करण्यात आले असून १५ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.