चाकण शहरातील सर्व मार्गांवर अवैध वाहतुकीचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:37 AM2020-12-17T04:37:21+5:302020-12-17T04:37:21+5:30
-- चाकण : चाकण शहरातील सर्वच प्रमूख मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूकीचा कळस झाला आहे. अवैध प्रवासी वाहन चालक मध्यरस्त्यात ...
--
चाकण : चाकण शहरातील सर्वच प्रमूख मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूकीचा कळस झाला आहे. अवैध प्रवासी वाहन चालक मध्यरस्त्यात प्रवाशांना गाठून आपल्याकडे खेचत आहेत. त्यामुळे ''''सुरक्षित प्रवासाचा'''' मंत्र देणाऱ्या एसटीची आणि पीएमपीएमएलची प्रवासी संख्या घटत चालली आहे. चाकण भागातील नागरिक अनेक दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूकदारांच्या दादागिरीने वैतागून त्रस्त झाले आहेत. चाकण शहरातील अवैध प्रवाशी वाहतुकीत अर्थपूर्ण हितसंबंधातून प्रशासनाचा यावर वचक नसल्यामुळे खुलेआम ही अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे.
मुख्य मार्गावरच उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे पुणे नाशिक महामार्ग , चाकण तळेगाव व शिक्रापूर राज्य मार्ग आणि चाकण ते आंबेठाण या जिल्हा मार्गावर अवैध वाहतूक मोठ्या संख्येने सुरू आहे. यामुळे सततची वाहतुकीची कोंडी होत असते. पीएमपीएमएलच्या बस, एसटी ज्या ठिकाणाहून सुटते तेथेच सहाआसनी, व्हॅन, तीनआसनी,जीप,इको वाहनचालकांनी बेकायदा शिरकाव केला असून सर्वच चौकांमध्ये अवैध प्रवासी वाहतूकदार दहशतीच्या जोरावर अवैध प्रवाशी वाहतूक करत आहेत. वाहनातून प्रवाशी वाहतूक करण्याची काही मर्यादा असूनही या नियमाला धाब्यावर बसवून दुप्पट तिप्पट प्रवाशांची बेकायदा वाहतूक सर्रास केली जाते.
चाकणच्या तळेगाव चौक व आंबेठाण चौकतील भोसरी,शिक्रापूर, तळेगाव तसेच खेड व आंबेठाण या रस्त्यांवर अवैध प्रवाशी वाहने बिनदिक्कतपणे प्रवाशी वाहतुक करत आहेत. यामुळे एसटी बस व पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडावली असल्याने, ही वाहतूक व्यवस्था तोट्यात प्रवाशी वाहतूक करत आहे,काही हजारोंच्या संख्येत असलेल्या या अवैध प्रवाशी वाहनांकडून,लाखो रुपयांचा मलिदा मिळत असल्याने याकडे जाणीवपूर्वक वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
--
वाहनातून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रवाशी वाहतुकीवर काही निर्बंध घातले आहे.परंतु चाकण शहरातील अवैध प्रवाशी वाहतुकीला पोलीस प्रशासनाचे अभय मिळत असल्याने अगदी खचाखच प्रवाशी भरून ही वाहने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवत आहेत.जीर्ण झालेल्या सहा आसनी रिक्षा,व्हॅन व जीप यातून अवैध प्रवाशी वाहतूक केली जाते. इन्शुरन्स,पासिंग,फिटनेस आदी परवाने नसलेल्या वाहनांचा वापर केवळ पैसे कमवण्यासाठी होत असून,प्रवाश्यांकडून अवाच्या सव्वा भाडे वसूल केले जात आहे.मास्क वापरणे बंधनकारक असतानाही याकडे मात्र दुर्लक्ष करत वाहनचालक वाहने दामटात आहेत.
--
वाहतूक पोलीस फक्त बघ्याच्या भूमिकेत -
चाकण परिसरात सर्वच मार्गावर सुरू असलेल्या वाहतूक कोंडी व अवैध वाहतूकीवर आळा घालण्याचे सोडून केवळ बघ्याची भूमिका घ्यायची आणि दिवसभरात दिलेल्या टार्गेटची अंमलबजावणी करण्यासाठी नियमांचे पालन करणाऱ्या वाहनांचे पाठीमागून फोटो काढून ऑनलाइन दंड पावती पाठवण्याचे काम वाहतूक पोलीस करताना दिसत आहेत.तर वाहतूक पोलिसांसमोर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांना कारवाई न करता सूट दिली जात आहे.
-------------------------------------------------------
फोटो : १६ चाकण अवैध वस्तू
फोटो: चाकण मधील बस स्थानकावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने.