पुणे जिल्ह्यातील दहिटणेत बेकायदा वाळूउपसा; यवत पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 06:45 PM2018-02-07T18:45:05+5:302018-02-07T18:50:41+5:30
दहिटणे (ता. दौंड) येथील बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर अखेर महसूल विभागाने कारवाई केली असून यामध्ये विठ्ठल दौंडकर व म्हैत्रे या दोन व्यक्तींच्या नावावर यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहू : दहिटणे (ता. दौंड) येथील बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर अखेर महसूल विभागाने कारवाई केली असून यामध्ये विठ्ठल दौंडकर व म्हैत्रे या दोन व्यक्तींच्या नावावर यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गावकामगार तलाठी पुंडलिक केंद्रे यांनी दिली.
या वाळूमाफियांनी २ लाख २४ हजार किमतीच्या ३२ ब्रास वाळूची तस्करी केली आहे. एक पोकलेन व दोन ट्रॅक्टर या प्रकरणी जप्त करण्यात आले आहेत.
बुधवार (दि. ३१) रोजी महसूल विभागाचे पथक दहिटणे येथे मुळा-मुठा नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर कारवाईसाठी गेले, परंतु वरिष्ठांच्या व तालुक्यातील राजकीय मंडळींच्या फोनमुळे या वाळूमाफियांवर कारवाई करण्यास राहू मंडल विभागाच्या पथकाला उशीर लागला. परंतु या पथकाने अखेर कुणालाही न जुमानता कारवाई केली.
वाळूमाफियांना आवर घालायचा असेल तर वरिष्ठांनी आणि तालुक्यातील बढ्या पुढाऱ्यांनी कारवाईतील हस्तक्षेप पूर्णत: थांबविण्याची गरज असल्याचे परिसरातील संतप्त ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
गेल्या महिन्यात याच ठिकाणी महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली होती. परंतु नेहमीप्रमाणे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आदेश डावलून या वाळूमाफियांनी आपली तस्करी सुरुच ठेवली आहे. ही वाळूतस्करी करताना येथील शेतकरी तानाजी कोळपे या शेतकऱ्याची दीड हजार फूट शेती पाणी उपसासिंचन योजना फुटल्याने मला न्याय मिळेल का? माझे झालेले आर्थिक नुकसान मिळणार का? अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.
या पथकामध्ये मंडल अधिकारी सुनंदा येवले, अर्जुन स्वामी, आनंदा ढगे, पुंडलिक केंद्रे सहभागी होते.