देशाला तीन सरन्यायाधीश, राज्याला तीन मुख्यमंत्री देणारे पुण्यातील ILS LAW काॅलेज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 03:23 PM2023-03-27T15:23:49+5:302023-03-27T15:55:34+5:30
आयएलएसचे पी. बी. गजेंद्रगडकर, वाय. व्ही. चंद्रचूड, ई. एस. वेंकटरामय्या हे माजी विद्यार्थी सर्वाेच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाले
प्रशांत बिडवे
पुणे : देशाला तीन सरन्यायाधीश, महाराष्ट्राला तीन मुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश आणि असंख्य विधिज्ज्ञ घडविणारे शहरातील इंडियन लाॅ साेसायटी म्हणजेच ‘आयएलएस’ लाॅ कॉलेज शताब्दी वर्षांत प्रवेश करत आहे. या काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी विधीसह देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला आहे. आयएलएस काॅलेज २० जूनला शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. या महाविद्यालयाला २० जून २०२४ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.
आयएलएस लाॅ काॅलेजची स्थापना २० जून १९२४ राेजी झाली होती. मागील ९९ वर्षांत काॅलेजने विधी शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा निर्माण केला आहे. काॅलेजने असंख्य अभ्यासू वकील, न्यायाधीश घडविले आहेत. तसेच शिक्षण घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी भारतीय राजकारणात कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. काॅलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर विधी क्षेत्रात सर्वाेच्च कामगिरी करीत जस्टीस पी. बी. गजेंद्रगडकर (१९६४-६६), जस्टीस वाय. व्ही. चंद्रचूड (१९७७-८५) आणि जस्टीस ई. एस. वेंकटरामय्या (१९८९) हे तीन माजी विद्यार्थी सर्वाेच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाले.
काॅलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी राजकीय क्षेत्रातही देदीप्यमान कामगिरी केली. यशवंतराव चव्हाण यांनी देशाच्या उपपंतप्रधानपदाला गवसणी घातली. तत्पूर्वी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हाेते. यासाेबतच सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख दाेघेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्रिपदीही विराजमान झाले हाेते. गाेपीनाथराव मुंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री म्हणून काम केले आहे.
सर्वाेच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची कारकीर्द :-
- पी. बी. गजेंद्रगडकर यांची १९५७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि १९६४ मध्ये सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली. महागाई भत्ता आयोग, जम्मू आणि काश्मीर चौकशी आयोग, राष्ट्रीय श्रम आयोग तसेच बनारस हिंदू विद्यापीठ चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे.
- वाय. व्ही. चंद्रचूड सर्वाधिक ७ वर्षे ४ महिने सरन्यायाधीश म्हणून कार्यरत हाेते. त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन काॅलेजमधून पदवी घेतल्यानंतर १९४२ साली आयएलएस काॅलेजमधून कायद्याची पदवी मिळविली. मुंबई उच्च न्यायालयात १९६१ साली न्यायाधीश झाले. सर्वाेच्च न्यायालयात १९७२ मध्ये न्यायाधीश तर १९७७ मध्ये भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजकीय दबावाला झुगारून देत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले.
- ई. एस. वेंकटरामय्या हे १९८९ मध्ये सरन्यायाधीश झाले. विधी क्षेत्रातील कारकिर्दीस १९४६ मध्ये सुरुवात केली. नाेव्हेंबर १९७० साली कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. सर्वाेच्च न्यायालयात १९७९ मध्ये न्यायाधीश आणि त्यानंतर १९८९ मध्ये सरन्यायाधीशपदी नियुक्त झाले. ते कर्नाटकचे पहिले सरन्यायाधीश म्हणून ओळखले जातात.