मी मेंटली फिट :पंकजा मुंडेंची फिटनेस चॅलेंजवर प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 07:02 PM2018-05-26T19:02:15+5:302018-05-26T19:02:15+5:30
मी मेंटली फिट आहे, फिजिकली माहिती नाही अशा शब्दात महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी फिटनेस चॅलेंजची खिल्ली उडवली आहे.
पुणे : मी मेंटली फिट आहे, फिजिकली माहिती नाही अशा शब्दात महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी फिटनेस चॅलेंजची खिल्ली उडवली आहे. मोदी सरकारच्या कामगिरीची चार वर्षे या विषयावर आयोजित पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.
यावेळी मुंडे यांना केंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धन राठोड यांनी दिलेले फिटनेस चॅलेंज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले आहे. त्यानंतर राज्यातील वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनीही ते चॅलेंज स्वीकारले. त्याप्रमाणे आपणही ते स्वीकारणार का यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.आपल्या उत्तरावर सावरून घेताना माझे बॉस अर्थात नरेंद्र मोदी अठरा तास काम करत असल्याने मलाही ते करावे लागते असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या बाजूला बसलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीही मी तर फिटच आहे, मला गरज नाही असे पुणेरी उत्तर दिले.
पेट्रोल डिझेलवरील वाढत्या किमतींवर त्यांनी यावेळी भाष्य केले.याबाबत मुख्यमंत्री महोदय केंद्र सरकारसोबत बोलत असून लवकरच किंमती कमी होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सत्तेत असताना असो किंवा विरोधात असताना असो पेट्रोलच्या किंमती वाढल्यावर मी देखील अस्वस्थ होते अशा शब्दात त्यांनी मन मोकळे केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कारभारावर भाष्य केले आणि राबवलेल्या योजनांची माहिती सांगितली.त्यात जीवन ज्योती विमा योजना, स्वच्छ भारत मिशन, जनधन योजना,वय वंदन योजना, बीबीटीचा निर्णय अशा विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम केल्याचा उल्लेख त्यांनी केला.