‘डॉक्टर लूटमार करतात’ या ‘जनसुनवाई’ला ‘आयएमए’चा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:10 AM2021-02-10T04:10:53+5:302021-02-10T04:10:53+5:30
पुणे : डॉक्टर लूटमार करतात, रुग्णाच्या नातेवाईकांकडून अवाजवी पैैसे घेतात, असा प्रचार जन आरोग्य अभियान या तथाकथित स्वयंसेवी संस्थेने ...
पुणे : डॉक्टर लूटमार करतात, रुग्णाच्या नातेवाईकांकडून अवाजवी पैैसे घेतात, असा प्रचार जन आरोग्य अभियान या तथाकथित स्वयंसेवी संस्थेने चालू केला आहे. या प्रचाराला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आक्षेप घेतला आहे.
“समाजसेवक’ नक्की काय साध्य करु पाहत आहेत. यातून गैैरसमज पसरून रुग्णालये आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांविरुद्धचा हिंसाचार वाढू शकतो याची त्यांना कल्पना आहे का,” असा प्रश्न ‘आयएमए’ने उपस्थित केला आहे. आरोग्य व्यवस्थेकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, स्वयंघोषित समाजसेवक मंडळींच्या नकारात्मक भूमिका यामुळे तरुण वैैद्यकीय क्षेत्राकडे यायला तयार होत नाहीत, याकडे ‘आयएमए’ने लक्ष वेधले आहे.
जन आरोग्य अभियानातर्फे खाजगी रुग्णालयांकडून कोरोनाकाळातील सामान्यांच्या लुटीबद्दल नुकतीच ‘जनसुनवाई’ आयोजित करण्यात आली. या जनसुनावणीत अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी महामारीच्या काळात आलेले क्लेशकारक अनुभव कथन केले. या वेळी हॅशटॅग भरमसाठ बिल आकारणीवर नियंत्रण, रुग्ण संरक्षण कायदा महाराष्ट्र ही मोहीम सोशल मीडियावर सुरू करण्यात आली. या जनसुनावणीला ‘आयएमए’ने आक्षेप घेतला आहे.
“ज्यांनी आपल्या जिवावर उदार होत साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. संस्थेने वास्तव लक्षात घेऊन ‘साप म्हणून भुईला धोपटणे थांबवावे’ किंवा सरकारने तरी त्यांचा बंदोबस्त करावा,” अशी मागणी ‘आयएमए’ने केली आहे.
चौकट
‘आयएमए’चे प्रश्न
-स्वयंसेवी संस्थेला न्यायनिवाडा करण्याचा अधिकार कोणी दिला?
-लूट झालेल्या रुग्णांनी महसूल अधिकारी, महाराष्ट्र वैैद्यक परिषद, ग्राहक पंचायत, न्यायालये यांचे दरवाजे का ठोठावले नाहीत?
-महामारीच्या सुरुवातीच्या काळात आरोग्य सेवकांना पीपीई किट, सॅनिटायझर या वस्तू चढ्या भावाने खरेदी कराव्या लागल्या. त्यावेळी स्वयंसेवी संस्थेने काही मदत केली का, त्याविषयी आवाज उठवला का?